रांची : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारणी बैठकीमध्ये लोकसंख्या असमतोलावर प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. झारखंडची राजधानी रांची इथं आजपासून ही तीन दिवसीय बैठक होतेय.
जनगणनेच्या आकडेवारीमध्ये धार्मिक आधारावर जनसंख्येचं विवरण देण्यात आलंय. यात मुस्लिमांची लोकसंख्या शून्य पूर्णांक ८ टक्क्यांनी वाढल्याचं तर हिंदूंची शून्य पूर्णांक ७ टक्क्यांनी घटल्याचं समोर आलंय. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी या विषयावर संघ एक प्रस्ताव संमत करणार असल्याचं बैठकीच्या पूर्वसंध्येला मीडियासमोर म्हटलंय. त्या पार्श्वभूमीवर संघामध्ये विचारमंथन सुरू आहे.
ठरावाच्या रुपानं या विचाराला मूर्त स्वरुप या बैठकीत येण्याची शक्यता आहे. तसंच बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दाही या ठरावात चर्चिला जाऊ शकतो. बिहारमध्ये शेवटच्या टप्प्यात सीमांचल भागात ५ नोव्हेंबरला मतदान होतंय. तिथं बांलगलादेशी घुसखोरांचा प्रश्न मोठा आहे.
संघानं यावर काही ठोस भाष्य केल्यास भाजपाला फायदा होऊ शकतो, असं मानलं जातंय. नुकत्याच झालेल्या संघाच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी याचा ओझरता उल्लेख केला होता. लोकसंख्या नियंत्रणावर भाष्य करताना त्यांनी सर्वांना समान न्याय असला पाहिजे, असं म्हटलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.