नवी दिल्ली : रेल्वेने प्रवाशांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. आता रेल्वे बोर्डाने आरक्षण रद्द करण्याच्या नियमांत बदल केला असून प्रवाशांना तिकिट रद्द अनारक्षित खिडकीवरही करता येणार आहे.
बाहेरगावच्या प्रवासाला जाण्यासाठी १२० दिवस आधीपासून केलेले आरक्षण रद्द करण्यासाठीची प्रवाशांची वणवण कमी करण्यासाठी आता रेल्वे बोर्डाने आरक्षण रद्द करण्याच्या नियमांत बदल केलाय. या नव्या नियमांनुसार तिकीट रद्द करण्यासाठी प्रवासी आरक्षण केंद्रापर्यंत जाण्याऐवजी अनारक्षित तिकीट प्रणालीवरही हे काम होणार आहे.
१ डिसेंबरपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय. आरक्षण रद्द करण्यासाठी प्रवाशांना प्रवासी आरक्षण केंद्रापर्यंत जावे लागत होते. आरक्षण केंद्राच्या वेळा ठरलेल्या असल्याने प्रवाशांना वेळ पाळणे गरजेचे होते. त्यासाठी धावपळ करावी लागत होती. ही धावपळ आता टळली आहे.
रेल्वेने काही महिन्यांपूर्वी आरक्षण रद्दीकरणाचे नियम बदलल्यानंतर रद्द तिकिटाचे पैसे परत मिळण्यावरही वेळेची बंधने लावण्यात आली आहेत. प्रवाशांना तिकीट रद्द करण्याचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे बोर्डाने अनारक्षित तिकीट प्रणाली म्हणजेच रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवरही आरक्षण तिकीट रद्द करून देण्याची सुविधा केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.