नवी दिल्ली : सध्या तुरूंगातून सुटून आलेला आणि हिरो म्हणून मिरविणाऱ्या कन्हैयाला आपली जागा दाखवून देण्याचे काम एका मराठी प्राध्यापकाने जेएनयूमध्येच केले आहे.
जेएनयूतील इंग्रजीचे प्राध्यपक आणि कवी मकरंद परांजपे यांनी एआयएसएफचा अध्यक्ष कन्हैया कुमारने तुरुंगातून सुटल्यानंतर केलेल्या भाषणातील संदर्भ, दाखले वस्तुस्थितीला धरून नव्हते, असे त्याच्या तोंडावर सांगितले आहे.
जेएनयूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात 'अनसिव्हिल वॉर्स: टगोर, गांधी, जेएनयू अँड व्हॉट्स लेफ्ट ऑफ द नेशन' या विषयावर मकरंद परांजपे बोलत होते. यावेळी आपल्यापैकी किती जण स्वतंत्र काश्मीरला पाठिंबा देतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तेव्हा अवघे चार-पाच हात वर झाले. हे पाहताच कन्हैया कुमार आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी घोषणा देत त्यांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र परांजपे यांनी आपले भाषण सुरूच ठेवले आणि आपल्या भाषणातून कन्हैया कुमारने केलेले भाषण वस्तुस्थितीला धरून नव्हते याचा पाढाच वाचला.
गोळवलकर गुरुजी हे मुसोलिनीला भेटल्याचे कन्हैया कुमारने आपल्या भाषणात म्हटले होते. मात्र तुला खरा इतिहास माहित आहे का?, असा सवाल परांजपे यांनी कन्हैया कुमारला केला. मुसोलिनीला मुंजे भेटले होते, गोळवलकर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अर्थात त्यांना फॅसिस्ट विचार प्रभावी वाटले होते यात दूमत नाही. इतकेच नव्हे त्यांना एककेंद्री सत्ता त्याकाळात योग्य वाटत होती. त्यामुळे जे सत्य आहे तेच लोकांसमोर मांडा आणि जे वास्तवाला धरून नाही ते बोलू नका, असा सल्ला त्यांनी कन्हैयाला दिला.
फॅसिझम म्हणजे लोकशाहीच्या विरोधात उभी राहणारी संस्था आहे. त्यामुळे 'स्टॅलिनीझम' देखील फॅसिझमच ठरतो. तथाकथित न्यायिक हत्येवरून वाद सुरू असलेल्या देशातील नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. पण तुम्हाला माहित आहे का, १९२० ते १९५० या काळात स्टॅलिनच्या यूएसएसआरमध्ये किती न्यायिक हत्या झाल्या आहेत?, असा सवाल करत परांजपे यांनी कन्हैया कुमारच्या भाषणातील लेनिन, स्टॅलिनच्या विचारांचे इतिहासात किती भीषण परिणाम पाहायला मिळालेत ते समोर मांडले. तसेच सध्या जेएनयूमध्ये जो प्रकार घडला त्यामुळे समन्वयी भूमिका असणारे लोक कमी होत चालले आहेत आणि केवळ टोकाची मतं मांडणारीच उरली आहेत, असे वाटू लागल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवाद असलेला डावा विचार यावा, असेही परांजपे यावेळी म्हणाले.