www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राजकारणात फोन टॅपिंगचं एक वेगळं महत्व आहे. सत्ताधारी नेहमी विरोधकांच्या चालींना शह देण्यासाठी फोन टॅपिंगच्या माध्यमातनं पाळत ठेवत असते. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते अमित शहा या प्रकारात चर्चेत आलेत. सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीत तर अनेक नेत्यांना आपलं दूरध्वनी संभाषण रेकॉर्ड होत असल्याचा संशय आहे. फोन टॅपिंगची भिती वाटतेय.
देशातील राजकारण सध्या फोन टॅपिंगच्या भितीनं जखडलंय. अनेक जणांनी फोन टॅपिंगचा धसका घेतलाय. अनेक नेते फोन टॅपिंगच्या जाळ्यात फसत असल्याचं दिसून येतंय.... जनतेच्या सवालांपासून तोंड लपवत आहेत. तरुणीवर पाळत ठेवल्याच्या प्रकरणात अडकलेले आणि नरेंद्र मोदींचे उजवे हात मानले जाणारे अमित शहा यांना समजत नाहीये की आता फोन टॅपिंग प्रकरणातून कशी सुटका करुन घ्यावी.
अशी परिस्थीती आपल्यावर यायला नको म्हणून नेत्यांनी सावधानता बाळगायला सुरुवात केलीये. मिस्टर क्लिन अशी प्रतिमा असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा एका कार्यक्रमात आपली भिती जाहीर केली. राष्ट्रवादीनं यावर लगोलग आपली प्रतिक्रीया देत चौकशीची मागणी केलीये.
जनलोकपालासाठी आंदोलन करुन नेत्यांची झोप उडवणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे सुद्धा फोन टॅपिंगच्या मुद्यावरुन आपली भिती व्यक्त करतायेत. केजरीवलांवरुन ते नाराजी, संताप व्यक्त करतात. मात्र त्यांना फोन करत नाहीत. तर चिठ्ठी लिहीतात. कारण खुद्द अण्णांनाही फोन टॅपिंगची भिती वाटते.
भारतीय राजकारणात फोन टँपिंगचा इतिहास आणि भिती नवी नाही.
> राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी राजीव गांधी सरकारवर राष्ट्रपती भवनचे फोन टॅप होत असल्याचा आरोप केला होता.
> १९८८ मध्ये कर्नाटकात मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांना विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोपावरुन राजीनामा द्यायला लागला होता.
> १९९० मध्ये पंतप्रधान बनण्यासाठी निघालेले चंद्रशेखर यांनी राष्ट्रीय आघाडी सरकारवर फोन टॅपिंग होत असल्याचा आरोप केला होता.
> २००५ मध्ये समाजवादी पार्टीचे तत्कालीन महासचिव अमरसिंह यांचे फोन टॅप झाले होते. याबाबतची केस अजून कोर्टात सुरु आहे.
राजकारणात विरोधकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फोन टॅपिंग नेहमी एक हत्यार राहिलंय. सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीतही या प्रकारानं पुन्हा डोकं वर काढलंय. त्यामुळं नेत्यांच्या मनातली भिती लोकसभा निवडणुकापर्यंत कायम राहिलं असं चित्र सध्या तरी दिसतंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.