दिल्लीत रेकॉर्डब्रेक मतदान... लोकशाहीला शुभशकुन!

मतदानाबाबत निरुत्साही अशी ओळख असलेल्या दिल्लीकरांनी बुधवारी मात्र नवा चमत्कारच केला. भारतीय राजकारणाचं सत्ताकेंद्र असलेल्या दिल्लीत बुधवारी लोकशाहीची सिंहगर्जना झाली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 5, 2013, 09:31 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मतदानाबाबत निरुत्साही अशी ओळख असलेल्या दिल्लीकरांनी बुधवारी मात्र नवा चमत्कारच केला. भारतीय राजकारणाचं सत्ताकेंद्र असलेल्या दिल्लीत बुधवारी लोकशाहीची सिंहगर्जना झाली. कारण दिल्ली विधानसभेसाठी झालेल्या मतदानात आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडीत निघालेत.

एक नजर टाकूया दिल्लीतल्या गेल्या काही वर्षातल्या मतदानाच्या आकडेवारीवर....


> वर्ष १९९३ – ६१.७५ टक्के मतदान
> वर्ष २००३ – ५३.४ टक्के मतदान
> वर्ष २००८ – ५७.६ टक्के मतदान
> वर्ष २०१३ – ७० टक्के मतदान

जवळपास ७० टक्के मतदानाची नोंद करण्यात आलीय. दरवेळी मतदानासाठी घराबाहेर पडण्यासाठी का-कू करणारे दिल्लीकर बुधवारी मात्र मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर दाखल झाले. सर्वच मतदान केंद्राबाहेर मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. या मतदारांचा उत्साह इतका होता की मतदानाची नियोजित वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्राबाहेर मोठमोठ्या रांगा होत्या. त्यामुळं निवडणूक आयोगालाही अखेरीस मतदानाची वेळ वाढवावी लागली. दिल्लीतला गरीब, श्रीमंत, श्रमिक, कामगार, तरुण, ज्येष्ठ नागरिक प्रत्येकानं आपल्या मतदानाचा अधिकार बजावत लोकशाही बळकटीसाठी योगदान दिलं.
यात प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल तो तरुणांचा किंवा नवमतदारांचा.. भ्रष्टाचार आणि घोटाळ्याने त्रस्त असलेल्या या नव-मतदाराला आता चमत्कार घडवायचाय... राजकारण्यांकडूनही त्याच्या अपेक्षा वाढल्यात. सध्याचं चित्र पालटण्यासाठी आणि बदल घडवण्याच्या इराद्यानंच आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिल्लीकर पोहचले. हे सारं चित्र विकसित लोकशाहीचं द्योतक म्हणावं लागेल. अशाप्रकारे भरघोस मतदान करुन दिल्लीकरांनी मात्र साऱ्या देशवासियांपुढे नवा आदर्श निर्माण केलाय.
मतदानाच्या टक्केवारीचा हाच टेंड्र कायम राहिल्यास लोकसभेला ७० ते ८० टक्के मतदानाची आशा धरल्यास ती अतिशयोक्ती ठरु नये. त्यामुळं दिल्लीतलं मतदान हे लोकशाहीसाठी शुभशकुन म्हणावं लागेल. येत्या आठ तारखेला मतमोजणीत या निवडणूकीत कौल कोणाला मिळाला, ते स्पष्ट होईलच. मात्र, सध्या तरी दिल्लीकरांनी लोकशाहीचा विजय केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.