माझ्या हयातीत 'पाक' युद्ध जिंकणार नाही; पंतप्रधान चिडले

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच पाकला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘माझ्या हयातीत पाकिस्तान भारताविरुद्ध कोणत्याही प्रकारचं युद्ध जिंकण्याची शक्यताही नाही’ असं म्हणत पंतप्रधानांनी आपली चीड व्यक्त केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 5, 2013, 08:08 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच पाकला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘माझ्या हयातीत पाकिस्तान भारताविरुद्ध कोणत्याही प्रकारचं युद्ध जिंकण्याची शक्यताही नाही’ असं म्हणत पंतप्रधानांनी आपली चीड व्यक्त केलीय.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या एका वर्तमानपत्रानं प्रकाशित केलेल्या वक्तव्यावर मनमोहन सिंग यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. एका वर्तमानपत्रानं, ‘काश्मीर हा ज्वलंत मुद्दा आहे आणि याच मुद्द्यावर भारताबरोबर चौथ्यांदा युद्ध भडकू शकतं’ असं वक्तव्य नवाज शरीफ यांनी केल्याचं म्हटलं होतं. पत्रकारांशी बोलताना याच मुद्द्यावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि पाकिस्तानला एकप्रकारे ठणकावलंच.
दरम्यान, पाकिस्तानच्या एका अतिप्रचलित अशा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली ही बातमी खोटी आहे, असं सांगत पाक पंतप्रधान शरीफ यांच्या कार्यालयानं या बातमीचं खंडन केलंय. शरीफ यांच्या कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या स्पष्टीकरणानुसार, शरीफ यांनी पाक अधिकृत काश्मीर परिषदेत अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. ही बातमी निराधार, चुकीची आणि चुकीच्या उद्देशानं प्रसिद्ध करण्यात आलीय, असं स्पष्ट करण्यात आलंय.
शरीफ यांना पाकिस्तान आणि भारत यादरम्यानचा कोणताही प्रश्न आणि मुद्दे शांततेच्या मार्गानेच सोडवले जावेत असं वाटतं, असंही त्यांच्या कार्यालयानं म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.