www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
राजस्थानमध्ये २०० पैकी १९९ जागांसाठी आज मतदान पार पडलं. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशनंतर राजस्थानातही मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. राजस्थानात ७४.३८ टक्के मतदान नोंदवण्यात आलं.
जैसलमेर आणि हनुमानगडमध्ये सर्वाधिक ८५ टक्के मतदान झालं. काही ठिकाणी हाणामारी वगळता हे मतदान शांततेत पार पडलं. सकाळच्या सुमारास मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कुटुंबियांसह जोधपूरमध्ये मतदान केलं. तर माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे सिंधिया यांनी मुलासह मतदानाचा हक्क बजावला.
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यामुळं राजस्थानचं ‘रण’ कोण जिंकणार? याचा फैसला आता ८ डिसेंबरला होणार आहे.
मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळं विविध मतदान केंद्रांवर एकूण ५० मतदान यंत्रे बदलण्यात आली होती. अल्वर आणि दौसा जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी दोन ठिकाणी गोळीबार केल्याची घटना घडली. दौसा जिल्ह्यातील सलीमपूर परिसरात मतदानात अडथळा निर्माण करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा जवानांनी गोळीबार करत दोन फैरी झाडल्या.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.