www.24taas.com,नवी दिल्ली
दिल्लीसह उत्तर प्रदेशात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला असून, आजही रिमझिम पाऊस सुरु आहे. यापावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर पावसामुळे तापमानत कमालीची घट झाली.
१९४२नंतर प्रथमच असा मोठा पाऊस झाला. उत्तर भारतात अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीवर या पावसाचा परिणाम दिसून आला.
हवामान खाते विभागाच्या माहितीनुसार दिल्लीत ५० मिलीमीटर विक्रमी नोंद करण्यात आली. १९४२ या वर्षात फेब्रुवारीमध्ये विक्रमी पाऊस झाला होता. या पावसाचा रेकॉर्ड ७१ वर्षानंतर मोडला आहे. तर ११.५ डिग्री सेल्सियस रेकॉर्डची तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
पावसामुळे हवेत गारवा आहे. हवामानातील बदलामुळे थंडीत वाढ झाले आहे. अनेक सखल भागात आणि रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असून काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सकाळी दिल्लीत पाऊस सुरूच होता. हवामान खात्याने आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. पावसाबरोबरच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
एंड्रयू गंज, महिपालपूर, हरिनगर, आईआईटी क्रॉसिंग ते अधचीनी, यूसुफ सराय, मार्केट, मुनीरका फ्लायओवर, बदरपूर बॉर्डर, वजीरपूर, अशोक विहार, लक्ष्मीनगर आणि लाला लाजपतराय मार्ग या ठिकाणी पाणी भरले आहे.
दरम्यान, पावसामुळे काँग्रेसचे उपाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी प्रथमच आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या अमेठीच्या दौऱ्यावर जाणार होते. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राजनाथसिंह हे सुद्धा पहिल्यांदाच लखनौला जाणार होते. मात्र, या दोन्ही नेत्यांना पावसामुळे आपला नियोजित दौरा रद्द करावा लागला.