प्रत्येक वापरानंतर रेल्वेतील ब्लँकेट्स धुतले जाणार

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या ब्लँकेट्स दर दोन महिन्यांतून एकदा धुतल्या जातात अशी माहिती काहीच दिवसांपूर्वी रेल्वे राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली.

Updated: Mar 14, 2016, 09:34 AM IST
प्रत्येक वापरानंतर रेल्वेतील ब्लँकेट्स धुतले जाणार title=

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या ब्लँकेट्स दर दोन महिन्यांतून एकदा धुतल्या जातात अशी माहिती काहीच दिवसांपूर्वी रेल्वे राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली. याविषयी कल्पना नसणाऱ्या प्रवाशांनी त्यावर मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली होती. आता मात्र प्रवाशांच्या या नाराजीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

यापुढे रेल्वेत दिल्या जाणाऱ्या ब्लँकेट्स इतर बेडरोलप्रमाणेच प्रत्येक वापरानंतर धुतल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. देशात पहिल्यांदाच रेल्वे अशा प्रकारची सोय करणार आहे. 

प्रशासनातर्फे नव्या ब्लँकेट्सची निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या वापरात असलेल्या ब्लँकेट्स दररोज धुता येणार नाहीत. म्हणूनच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे नव्या ब्लँकेट्सची निर्मिती केली जाणार आहे. या ब्लँकेट्स तयार करण्यासाठी लोकर आणि सुताचे मिश्रण असलेले हलक्या वजनाचे, पण उबदार असलेले कापड तयार केले गेले आहे. हे कापड प्रत्येक वापरानंतर धुतले जाऊ शकेल.  

सुरुवातीच्या टप्प्यात काही प्रिमिअर दर्जाच्या गाड्यांमध्ये या ब्लँकेट्सचा प्रायोगिक तत्वावर वापर केला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये दिल्या जातील, अशी माहिती रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. 

रेल्वेने केलेल्या एका चाचणीनुसार प्रवाशांना प्रवासादरम्यान मिळणारे बेडरोल केवळ सफेद रंगापेक्षा इतर रंगांमध्ये मिळाले तर जास्त आवडेल अशी माहिती पुढे आली आहे. तेव्हा हे बेडरोल नवीन रंगात तयार करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. त्याशिवाय रेल्वेच्या डब्यांतील पडद्यांच्या नवीन डिझाईनवरही सध्या काम सुरू आहे.