फरिदाबाद: हरियाणातल्या फरिदाबादमध्ये झालेल्या जळित कांडातल्या कुटुंबियांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज भेट घेतली. पंतप्रधान मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातल्या दुर्बल घटकांना चिरडण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या याच मानसिकतेतून अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं गांधी म्हणाले.
दलितांच्या एका कुटुंबाला जाळण्याची नृशंस घटना हरियाणाच्या सुनपेड गावात मंगळवारी घडली. यामध्ये अडीच वर्षे आणि ११ महिने वयाच्या बहीण भावांचा होरपळून मृत्यू झाला, आई ७० टक्के भाजली तर वडीलांनाही जखमा झाल्या आहेत. आज काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधींनी या गावाला भेट दिली असून गावकऱ्यांसह या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांनी वल्लभगड फरीदाबाद महामार्ग बंद पाडला असून खट्टर सरकारनं कठोर पावलं उचलावी तसंच सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास हे दलित कुटुंब झोपलं असताना वरच्या वर्गाच्या काही जणांनी पेट्रोल ओतून घराला आग लावली. राजधानी दिल्लीच्या सीमेपासून सुनपेड हे तुलनेनं जवळ असून असा प्रकार खुद्द दिल्लीजवळ घडल्यानं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपाला धारेवर धरलंय.
हरयाणा पोलिसांनी चार जणांना अटक केली असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. जितेंद्र या पीडित व्यक्तिच्या सांगण्यानुसार काही दिवसांपूर्वी राजपूत समाजाच्या काही जणांबरोबर त्याचा वाद झाला होता ज्यांची पोलीस तक्रारही करण्यात आली आहे आणि त्यांनीच घराला आग लावली आहे. माझ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी त्यांनी दिली होती आणि गावातून जाण्यास आणि परत कधीही न येण्यास सांगितलं होतं असंही जितेंद्रनं सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.