मुंबई : राजन यांची देशभक्ती इतरांपेक्षा तसुभरही कमी नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन आणि अर्थमंत्रालयामधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे, या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राजन यांच्या देशभक्तीमध्ये कोणतीही कमतरता नाही, यापुढेही ते देशाची सेवा नक्कीच करतील, असंही यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
राजन यांच्यासहच आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम तसेच अर्थसचिव शशिकांत दास यांच्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी तीव्र हल्ला चढविला. स्वामींच्या या टीकेपासून लांब राहण्याचे धोरण भाजपने स्वीकारले आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची भूमिकेचं कौतुक होत आहे.
मोदी यांनी स्वामी यांचे नाव न घेता म्हटलं आहे, 'माझा पक्ष असो वा अन्य कुठलाही पक्ष असो, अशा प्रकारची टीका करणे अयोग्य आहे. लोकप्रियतेच्या या हव्यासामुळे देशाचे काहीही भले होणार नाही. लोकांनी जबाबदारीने वागावयास हवे. स्वत:ला जर कोणी व्यवस्थेपेक्षा मोठे समजत असेल; तर ते सर्वबाजूने चूक आहे.'