मोहाली : पंजाबी गायक जरनैल सिंह ऊर्फ जेली आणि अन्य तिघांविरोधात शुक्रवारी सामूहिक बलात्कार आणि अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आलीय. एका अभिनेत्रीनं २९ सप्टेंबर रोजी सास नगरमध्ये या चौघांविरोधात ही तक्रार दाखल केलीय.
‘जेलीनं गँगरेपचा व्हिडिओ बनवलाय... हा व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत त्यानं यानंतर अनेक वेळा बलात्कार केल्याचा’ आरोप या अभिनेत्रीनं केलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. घटस्फोट आणि पोटगीसाठी तिचा खटला कोर्टात सुरु आहे. याच वर्षांच्या जुलै महिन्यात जेली आणि मांगानं नशेचे पदार्थ तिच्या खाण्यामध्ये टाकून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. परंतु, यावेळी पीडित अभिनेत्रीनं पोलिसांशी संपर्क केला नाही. कारण, आरोपींनी आपल्या कृत्याचा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्याची तिला धमकी दिली होती. पीडित अभिनेत्री गर्भवती राहिल्यावर तिच्यावर गर्भपात करण्यासाठीही जबरदस्ती करण्यात आली, असं अभिनेत्रीनं तक्रारीत म्हटलंय.
तक्रीरीनुसार, पीडित महिलेचं चार लोकांनी १७ ऑक्टोबर रोजी अपहरण केलं होतं. त्यानंतर तिला एके निर्जण ठिकाणी नेऊन तिला मारहाणही करण्यात आली. तिच्या पोटावर लाथा-बुक्यांनी मारून तिला एका धार्मिक स्थळाच्या बाहेर मरण्यासाठी सोडून दिलं गेलं.
शुद्धीत आल्यानंतर पीडितेनं आपल्या एका मित्राला कॉल करून बोलावून घेतलं. मित्रानं तिला हॉस्पीटलमध्ये दाखल केलं आणि तिच्यावर उपचार करण्यात आले. ‘एफआयआर’मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पीडिता पाच दिवसांपर्यंत हॉस्पीटलमध्ये राहिली त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी तिनं पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अद्याप कोणत्याही आरोपीला अटक केलेली नाही.
पोलीस अधीक्षक हरपाल सिंह संधु यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपांच्या प्राथमिक चौकशीनंतर प्रकरणाची नोंद करण्यात आलीय. या प्रकरणात लवकरच अटक केली जाईल. आरोपींविरोधात आयपीसी कलम ३७६ डी (सामूहिक दुष्कर्म), ३७६ (बलात्कार), ३६३ (अपहरण) यांसहीत इतर आणखी काही कलमांनुसार तक्रार दाखल करण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.