नवी दिल्ली : 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या रायबरेली मतदारसंघातून त्यांच्या कन्या प्रियंका गांधी निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
समाजवादी पक्षाशी आघाडीचा निर्णय घेण्यासाठी प्रियंका गांधींनी केलेल्या वाटाघाटी यशस्वी झाल्या. समाजवादी पक्षानं काँग्रेससाठी 105 जागा सोडण्याचा निर्णय घेतला. या वाटाघाटीनंतर प्रियंका गांधींचा राजकारणात सक्रिय सहभाग अधिकृत झालाय. त्यामुळे आता काँग्रेसच्या वर्तुळात प्रियंकांच्या लोकसभा एन्ट्री बाबात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
सोनिया गांधी गेल्या वर्षभरापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय राजकारणापासून लांब आहेत. रायबरेली हा गांधी घरण्याचा हक्काचा मतदारसंघ आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनंतर सोनिया गांधींनी याच मतदारसंघाचं गेली पंधरा वर्षांहून अधिक काळ सलग प्रतिनिधित्व करत आहेत. प्रकृतीच्या कारणानं आता सोनियांना जर खासदारकी सोडावी तर त्यांची जागा प्रियंकाच घेणार अशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरू झालीय.