नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर जाहिरातीतून टीका करताना अण्णा हजारेंच्या फोटाला हार घातल्यानं भाजपावर टीका होत असतानाही त्यांनी केजरीवालांवर हल्ला सुरूच ठेवला आहे.
भाजपानं आणखी एक जाहिरातीच्या माध्यमातून केजरीवालांवर निशाणा साधला असून २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचं आमंत्रण न मिळाल्यामुळं झालेला वाद आणि परेड पास यावर जाहिरातीतून टीका करण्यात आली आहे. तसंच केजरीवाल 'उपद्रवी गोत्रा'चे आहेत असंही म्हटलं आहे.
या जाहिरातीत २६ जानेवारीचा सोहळा कार्टूनच्या माध्यनातून दाखवण्यात आला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान मंचावर असल्याचं चितारण्यात आलं आहे. तर परेडदरम्यान केजरीवाल झाडू फिरवत राजपथावर उपस्थित असलेले दाखवण्यात आले आहे आणि त्या शेजारी 'मेरी ना सुनी तो तो २६ जनवरी का प्रोग्राम भी बिगाड जाऊंगा... और एक साल बाद व्हीआयपी पास की गुहार भी लगाउंगा' असंही लिहिण्यात आलं आहे.
तसंच जाहिरातीच्या खाली केजरीवाल यांना 'आंदोलनकारी' असं संबोधित करत ' देशातील कोट्यवधी लोक प्रजासत्ताक दिन साजरा करतात, त्याबद्दल अभिमान बाळगतात आणि तुमचे उपद्रवी गोत्र त्यातही अडथळा आणण्याच्या तयारीत होता. आता यांनी ( केजरीवाल) पलटी मारली असून ते प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी व्हीआयपी पासची मागणी करत आहेत.'
'तुम्ही आम आदमी आहात की व्हीआयपी? हे एकदाच ठरवा. की आम आदमीच्या वेशातील खास आदमी? आपण दिल्लीला अशा धोकेबाज लोकांच्या हातात सोपवू शकतो का? ज्यानं ४९ दिवस दिल्लीच्या नाकात दम केला ती व्यक्ती ५ वर्षांत दिल्लीची काय गत करेल?' असा सवालही जाहिरातीच्या शेवटी विचारण्यात आला आहे.
आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांनी या जाहिरातीबाबत नाराजी नोंदवली आहे. 'भाजपानं आज जाहिरातीत हद्द केली आहे, असं ट्विट केजरीवाल यांनी केलं आहे. ' भाजपानं जाहिरातीत माझ्या गोत्राला उपद्रवी गोत्र म्हणत संपूर्ण अगरवाल समाजालाच उपद्रवी म्हटलं आहे. त्यांची लढाई माझ्याविरोधात असू शकते, पण ते संपूर्ण अगरवाल समाजावर टीका कशी करू शकतात? या जाहिरातीतून भाजपा आता जातीपातीच्या राजकारणावर उतरली असून त्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागितली पाहिजे. याप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच दिवस उरलेले असताना आप आणि भाजपामध्ये चांगलंच युद्ध रंगलं आहे. भाजपानं आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना टार्गेट करण्यासाठी जाहिरातींचं माध्यम निवडलं आहे. यापूर्वी आलेल्या एका जाहिरातीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसवर टीका करण्यात आली होती आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या फोटोला चक्क हार घातल्याचं दाखवण्यात आलं होतं. या जाहिरातीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेससोबत लग्न केलं आणि ते त्यांच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेऊन शपथ घेतानाचं दाखवण्यात आलं. या चित्रात भिंतीवर अण्णा हजारेंचा फोटो असून या फोटोला हार घालण्यात आला होता. त्यावरून भाजपावर चहुबाजूनं टीका होत असतानाही त्यांनी जाहिरातींचं सत्र सुरूच ठेवलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.