कारमधूनही हवाई सफर शक्य

येत्या काही वर्षात कारमधूनही हवाई सफर करता येणार असं कुणी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल ना. पण हे खरंय.  

Updated: Dec 16, 2014, 10:35 AM IST
कारमधूनही हवाई सफर शक्य title=
संग्रहीत

निपाणी, बेळगांव : येत्या काही वर्षात कारमधूनही हवाई सफर करता येणार असं कुणी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल ना. पण हे खरंय.  

केवळ हवेत उडणारीच नव्हे तर प्रत्यक्ष या कारमधून हवाई प्रवासही करता येणार आहे. खरं तर हे केवळ स्वप्नच. पण कारमधून हवाईसफरीचं हे स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केलाय निपाणीच्या महेश महाजन या लघुउद्योजकानं.

फ्लाईंग कारचं तसं मॉडेलच त्यांनी तयार केलंय. त्यांच्या जवळपास २० वर्षांच्या प्रयत्नाला यश आलंय. त्यांनी बनवलेल्या या मॉडेलला चेन्नईतल्या पेटंट ऑफिसनं २६ सप्टेंबरला मान्यता दिलीय. तसंच ३ एप्रिल २०१४ ला सर्च रिपोर्टही दिलाय. 

या कार्यालयानं 'एअर थर्स्ट व्हेईकल' नावानं रजिस्ट्रेशन करून जगातल्या दीडशेवर देशांत पेटंट मागायलाही परवानगी दिलीय. मॉडेलपासून तयार करण्यात येणारी १२०० किलो वजनाची कार ४ व्यक्ती घेऊन हवेत भरारी घेऊ शकणार आहे. 

बाजारातल्या उपलब्ध भागांचा वापर करुन महाजन यांनी लक्ष्मी नारायण फ्लाईंग कारचं मॉडल बनवलंय. यामध्ये महाजन यांना कुटुंबीयांचंही मोलाचं सहकार्य लाभलंय.
 
विमानाशी साधर्म्य असणाऱ्या या कारसाठी 'एव्ही ०८ बी हरेर' या विमानाची कन्सेप्ट डोक्यात ठेवून इंजिन, इलेक्ट्रॉनिक पार्ट, कंट्रोल बोर्डचा वापर करण्यात आलाय. ही कार केवळ इंधन आणि स्वीचवर चालणारी आहे.

या फ्लाईंग कारच्या मॉडलचं पेंटट घेऊन तयार करण्यात येणारी कार सर्वसामान्यांना परवडणारी असावी अशी इच्छा महेश महाजन यांची आहे. मात्र, त्यासाठी काही दिवस थांबावं लागणार आहे. मात्र महेश महाजनांच्या फ्लाईंग कारचं संशोधन सर्वत्र चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय बनलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.