नवी दिल्ली : दिल्लीत सध्या राजकीय घडामोडींचा आखाडा बनलाय. लोकसभेत काँग्रेसने सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडलेय. तर भाजपने काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित केले. यावर राजकारण तापले असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिसरी खेळी मांडली असून गैर काँग्रेस आणि भाजप राजकीय पक्षांच्या बैठकीला हाक दिली आहे.
गोंधळात संसदेचे पावसाळी अधिवेशन असतानाच शरद पवार यांच्या राजनीतीने वेग घेतला आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी मंगळवारी दिल्लीत आल्याची संधी साधत गैरभाजप, गैरकाँग्रेस पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न पवार यांनी सुरू केलेत. यासाठी बुधवारी सायंकाळी पवार यांच्या निवासस्थानी बैठक होत आहे. यात तिसऱ्या आघाडीची चाचपणी होण्याची शक्यता आहे.
या बैठकीला जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव आणि के. सी. त्यागी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव किंवा रामगोपाल यादव, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय आणि डेरेक ओब्रायन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
काँग्रेसला एकटे पाडण्याचा डाव पवारांचा दिसत आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व जोर धरु लागल्याने पवारांनी अन्य पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार पवार यांच्या ६ जनपथ येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजता ही बैठक होणार आहे. तत्पूर्वी, सायंकाळी ४ वाजता ममता पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.