नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यादेखील त्यांच्या कामगिरीवर प्रचंड खूष आहेत. आपल्या भावाला भेटण्यासाठी जशोदाबेन सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आल्यात.
पंतप्रधान म्हणून मोदींच्या कामगिरीबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला असून, मोदींसाठी यापुढंही त्या व्रतवैकल्ये सुरूच ठेवणार आहेत. दरम्यान, मोदी न्यायला आले तर त्यांच्यासोबत जाऊ, असंही त्यांनी सांगितलं...
इतकी वर्ष ‘पत्नी’च्या अधिकाऱ्यापासून वंचित असलेल्या जशोदाबेन यांनी अखेर नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहण्याबद्दल आपलं मौन सोडलंय. आपल्या पतीसोबत – नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहण्याची आपली इच्छा असल्याचंच यावेळी त्यांनी म्हटलंय... पण, यासाठी मोदीही तयार असायला हवेत, असंही त्यांनी म्हटलंय. झी मीडियाशी बोलताना जशोदाबेन यांनी हे वक्तव्य केलंय.
‘जर ते मला घ्यायला आले तर मी त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार आहे’ असं जशोदाबेन यांनी म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, आत्ताआत्तापर्यंत भारताचे ‘मोस्ट बॅचलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोदींनी याच वर्षी वडोदर लोकसभा मतदारसंघातून आपला अर्ज दाखल करताना पहिल्यांदा जशोदाबेन (६२ वर्ष) यांचा उल्लेख आपली पत्नी म्हणून केला होता.
जशोदाबेन यांना एसपीजी सुरक्षाही मिळालीय. ही सुरक्षा पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपलब्ध करून दिली जाते.
जशोदाबेन आणि नरेंद्र मोदी यांचं १९६८ साली लग्न झालं होतं. त्यावेळी, दोघंही अल्पवयीन होते. सध्या, जशोदाबेन शाळा शिक्षिका पदावरून सेवानिवृत्त झाल्यात... आणि सध्या आपल्या दोन भावांसोबत त्या गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील एका गावात राहत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.