नवी दिल्ली : 'मेक इन इंडिया' ही केवळ एक घोषणा नसून, ती प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. ही जाणीव प्रत्येकाकडे असली पाहिजे. एफडीआय म्हणजे केवळ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नसून, प्रत्येक भारतीयासाठी 'फर्स्ट डेव्हलप इंडिया' ही जबाबदारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या मिशन मेक इन इंडिया कार्यक्रम सोहळ्यात मोदी बोलत होते. पंतप्रधानांनी या योजनेचं उदघाटन केले. या सोहळ्याला ३० देश, ५०० सीईओ आणि तीन हजार कंपन्या हजर होत्या. भारताचा उत्पादन क्षेत्रावर भर असून २५ प्रमुख सेक्टर्समध्ये काम करण्यात येणार आहे. शिवाय कंपन्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी खास सेल बनवण्यात आलाय. इथं त्यांच्या प्रश्नांना ७२ तासांत उत्तर मिळेल, असे हे मिशन आहे.
# चंदा कोच्चर :
- मेक इन इंडिया मोहीमेमुळे देशाचा विकास होईल. भारतात तयार झालेली वस्तू जगातील सर्वोत्तम वस्तू असेल याची आम्ही ग्वाही देतो.
# मुकेश अंबानी :
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मेक इन इंडिया' मोहीमेमुळे उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगातील सर्वात सक्षम देश व्हावा. मोदींच्या चीन, जपान आणि आगामी अमेरिका दौ-यामुळे सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणामध्ये मोदी यांनी 'मेक इन इंडिया'चा नारा दिला होता. एफडीआयकडे केवळ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून न पाहता एफडीआय ही प्रत्येक भारतीयाचीच जबाबदारी आहे. प्रत्येकानेच त्याचा 'फर्स्ट डेव्हलप इंडिया' असाही अर्थ घेतला पाहिजे. भारताकडे केवळ बाजार म्हणून बघितले नाही पाहिजे. त्यापेक्षा येथील ग्राहकांची क्रयशक्ती कशी वाढेल, याचाही विचार केला पाहिजे. त्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. रोजगार वाढला तर सामान्य ग्राहकांची क्रयशक्ती वाढेल, असे ते म्हणाले.
लोकशाही, भौगोलिक रचना आणि बाजार या तीन गोष्टींमुळे परदेशी गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होतो, असेही त्यांनी सांगितले. भारताचे मंगळयान पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचल्यामुळे आपल्याकडे बुद्धिमान मनुष्यबळ आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जगातील नागरिकांना याबद्दल आपण विश्वास मिळवून दिला पाहिजे. जन-धन योजनेच्या माध्यमातून १५०० कोटी रुपये बॅंकेकडे जमा झाल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.