नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लाहोर दौरा केला, या दौऱ्यात अनेक सिक्रेट होते. सुत्राच्या माहितीनुसार सुरक्षेची संपूर्ण हमी मिळाल्यानंतरच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तान दौरा निश्चित करण्यात आला होता.
लाहोरच्या अलामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यावर नवाझ शरीफ यांनी उत्साहाने मोदींची गळाभेट घेतली, या दरम्यान विश्वास देण्यासाठी मोदी नवाझ शरीफ यांच्यासोबत पाकिस्तानच्या एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरमघ्ये बसले, पीएम मोदी यांच्यासोबत बसून ते शरीफ यांच्या घरी गेले.
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्याकडे असते, त्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच एसपीजीसाठी हे सर्व आव्हानात्मक होतं, लाहोरमध्ये शरीफ यांच्यासोबत कारमध्ये प्रवास हा देखील आव्हानात्मक प्रसंग होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडून करण्यात आलेल्या स्वागतामुळे भारावून गेले, पीएम मोदी यांनी नवाझ यांच्या आईंचे आशीवार्द घेतले.
शरीफ यांच्या नातीच्या लग्नाचा सोहळा घरी सुरू होता. नवाझ यांच्या नातीलाही मोदींनी आशीर्वाद दिले, नवाझ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या या जलद दौऱ्यात नवाज शरीफ यांच्या घरी मोदींनी दुपारचं जेवण केलं. मोदींना नवाझ शरीफ यांच्या जट्टी उमरा या निवासस्थानी पसंतीचं जेवणं साग समवेत इतर शाकाहारी भोजनाचा आनंद घेतला.
साग, दाळ आणि शाकाहारी पदार्थांसह इतर व्यजनही साजूक तुपात तयार करण्यात आले होते. जेव्हा मोदी लाहौरच्या बाहेरील क्षेत्रात जट्टी उमरा रायविंद रेसिडेन्सीत पोहोचले, तेव्हा नवाझ याचा मुलगा हसन आणि त्यांच्या परिवाराने मोदींचं जोरदार स्वागत केलं. मोदींचा हा पाकिस्तान दौरा अचानक होता, मागील दहा वर्षात पाकिस्तान भेटीला जाणारे ते पहिले पंतप्रधान आहेत.