नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून आज देशातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच गर्भवती महिलांसाठी एका नवी योजना जाहीर केली.
‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या या २२ व्या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, खोटी आमिषे आणि अवास्तव लाभ दाखवणारे ई-मेल आपण टाळायला हवेत. तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टाकलेला हा एक दरोडाच आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अॅंटीबायोटीक किंवा प्रतीजैवक घेऊ नका असा सल्ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून दिला.
ऑलिम्पिकसाठी गेलेल्या सर्व खेळाडूंना माझ्या शुभेच्छा, तुम्हीही सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्या. त्यासाठी ‘Narendra Modi App’वर शुभेच्छा पाठवा. आम्ही तुमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहचवू. मी १५ ऑगस्ट रोजी देशाला उद्देशून भाषण करणार आहे, त्या भाषणासाठी तुम्ही कल्पना सुचवू शकता, मोबाईल अॅपवर तुम्ही त्या कल्पना पाठवू शकता. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्त्व अभियानांतर्गत गर्भवती महिलांसाठी आम्ही विनामूल्य वैद्यकीय तपासणीची योजना सादर करत आहोत. दर महिन्याच्या नऊ तारखेला महिलेची विनामूल्य वैद्यकीय तपासणी केली जाईल. या योजनेला हजारो डॉक्टरांनी सहमती दर्शविली असून लाखो डॉक्टरांनी या मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे.
रक्षा बंधनाचा सण जवळ येत असून, भाऊ आपल्या बहिणीला प्रधानंत्री सुरक्षा विमा योजना भेट म्हणून देऊ शकतात. वृक्षारोपणाच्या भव्य चळवळीत सहभागी व्हा. राजस्थान सरकारने २५ लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला असून ही फार मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्रातील खंडु मारुती म्हात्रे यांची नात सोनल हिच्या विवाह सोहळ्यात आलेल्या पाहूण्यांना आंब्याचं झाड भेट म्हणून दिलं असल्याचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.