पार्क स्ट्रीट बलात्कार प्रकरणातील पीडिता सुजैट यांचं निधन

पार्क स्ट्रीट बलात्कार प्रकरणातील पीडिता सुजैट जॉर्डन यांचं शुक्रवारी निधन झालंय. त्यांच्या शरीरातील अनेक भागांनी काम करणं बंद केलं होतं. त्या गेल्या तीन दिवसांपासून हॉस्पीटलमध्ये भर्ती होत्या. अखेरीस, आज त्यांची प्राणज्योत मालवली. 

Updated: Mar 13, 2015, 02:57 PM IST
पार्क स्ट्रीट बलात्कार प्रकरणातील पीडिता सुजैट यांचं निधन  title=

कोलकाता : पार्क स्ट्रीट बलात्कार प्रकरणातील पीडिता सुजैट जॉर्डन यांचं शुक्रवारी निधन झालंय. त्यांच्या शरीरातील अनेक भागांनी काम करणं बंद केलं होतं. त्या गेल्या तीन दिवसांपासून हॉस्पीटलमध्ये भर्ती होत्या. अखेरीस, आज त्यांची प्राणज्योत मालवली. 

फेब्रुवारी २०१२ मध्ये सुजैट जॉर्डन यांच्यावर कोलकात्याच्या पार्क स्ट्रीट भागात एका चालत्या गाडीत पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. एका पबच्या बाहेर या पाच जणांनी त्यांना आपल्या गाडीत बसवलं होतं. सामूहिक बलात्कारानंतर त्यांना गाडीतून बाहेर फेकून देण्यात आलं. ही घटना उघडकीस आल्यानंतर देशभरातून एकच आक्रोश पाहायला मिळाला होता. 

या प्रकरणाताली तीन आरोपी तुरुंगात आहेत तर मुख्य आरोपीसहित इतर दोन जण अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. 

आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून सुजैट यांनी आपल्याला बलात्कार पीडिता म्हणून नाही तर आपल्या नावानंच ओळखलं जावं, असा आग्रह धरला होता. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र हे बलात्कार प्रकरण खोटं असून सरकारला अडचणीत आणण्याचा हा एक प्रयत्न असल्याचं म्हटलं होतं. सुजैट यांनी मात्र आपला राजकारणाशी काहीही देणंघेणं नसल्याचं सांगत बलात्कार पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उंचावला होता. 

आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनमध्ये सुजैट यांना महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.