नवी दिल्ली : ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’नं (WHO) भारताला ई-सिगारेटबद्दल चेतावणी दिलीय.
सिगारेटला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या या इलेक्ट्रॉनिक सिगारेट सध्या अनेक माध्यमांतून भारतात उपलब्ध होत आहेत. पण, या इलेक्ट्रॉनिक सिगारेट सामान्य सिगारेट इतक्याच घातक असल्याचं WHOचं म्हणणं आहे.
इलेक्टॉनिक सिगारेट सध्या ऑनलाईन माध्यमातून सहज ग्राहकांपर्यत पोहचताना दिसतायत. परंतु, हल्लीच्या काही वर्षांत ई-सागरेट मार्केटमध्ये सहज उपलब्ध झाल्यानं परिस्थिती नाजूक झालीय. अनेक तंबाखू कंपन्या, या ई – सिगारेटस् तंबाखूपासून वाचण्यासाठी सुरक्षित पर्याय म्हणून ग्राहकांसमोर सादर करत आहेत.
WHO शी निगडीत असणाऱ्या देशांना एकत्र करून संस्थेनं एक संमेलन आयोजित करण्याचं ठरवलंय. यापूर्वी याच मुद्यावर दक्षिण आशियाई देशही एक बैठक घेणार आहेत.
ई-सिगारेटची बाजारातली वाढती क्रेझ लक्षात घेता अनेक कंपन्या या फिल्डमध्ये उतरताना दिसताय. ई-सिगारेटवर सध्या भारतात कोणतेही निर्बंध किंवा नियंत्रण नाही.
काय आहे ई-सिगारेट?
एखाद्या पेनप्रमाणे किंवा सिगारेटच्याच आकाराच्या दिसणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटमध्ये बॅटरी, अॅटोमायजर आणि कार्ट्रेज असे तीन भाग असतात.
ई-सिगारेट वापरण्यासाठी त्यातील बॅटरी तुम्हाला चार्ज करावी लागते. यामधील कार्ट्रेजमध्ये धुम्रपान करण्यासाठी एक द्रव पदार्थ भरला जातो. यात प्रोपिलीन ग्लाइकॉल, ग्लिसरीन किंवा इतर स्वाद असणारे पदार्थ (चॉकलेट, पान फ्लेव्हर) भरले जातात.
यामध्येही निकोटीनसहीत किंवा निकोटीन विरहीत असे दोन पदार्थ उपलब्ध असतात. बॅटरीचं बटन दाबून या द्रवाला अॅटोमायजरच्या सहाय्यानं तोंडात धूर ओढला जातो. हा धूर सरळसरळ वापरकर्त्यांच्या फुफ्फुसांत दाखल होतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.