www.24taas.com, वृत्तसंस्था, बंगळुरू
अल्पसंख्याकांनी सरकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करणं हा त्यांचा हक्क असून, ही फसवणूक नाही, असं वादग्रस्त विधान केलंय कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वंर राव यांनी.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मतदारांना वेगवेगळे आश्वासन देऊन भुलवण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांनी सुरू केले आहेत. काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलतांना राव म्हणाले, “अनेक लोक सरकारी संस्थांकडून कर्ज घेतात. मात्र त्याची परतफेड न करता फसवणूक करतात. अल्पसंख्याक विकास महामंडळ हे तर छोटे कर्ज देण्याऐवजी ५० लाखांसारखे मोठे कर्ज मंजूर करतात. मात्र असं कर्ज घेणाऱ्या ते परत न करु शकणाऱ्या अल्पसंख्यांकांनी चिंता करण्याचं कारण नाही”.
परमेश्व्र राव यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधकांनी चांगलीच टीका केलीय. “जबाबदारीच्या पदावर असलेल्या वक्तीनं असं बेजबाबदार वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं” कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटलंय. तर काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांना मूर्ख बनवत असल्याचं, भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद जोशी म्हणाले.
विशेष म्हणजे काँग्रेसचा या कार्यक्रमाला केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री के. रेहमान खान, माजी खासदार जाफर शरीफ, मंत्री कमरूल इस्लाम, आर. रोशन बेग आणि नासिर अहमद हे उपस्थित होते.