‘गुगलमॅप’वर भारतीय ऐतिहासिक स्थळांचे ‘डिजिटल टुरिझम’

दूर अंतराच्या ऐतिहासिक स्थळांना फिरायला जायचंय पण पुरेसा वेळ नाही. चिंता करू नका. कारण येत्या काही दिवसांतच ‘गुगल मॅप` घेऊन येणारंय ऐतिहासिक स्थळांची दृश्यात्मक झलक! भारतातील शंभर ऐतिहासिक स्मारके आणि स्थळांचे, असे ‘स्ट्रीट व्ह्यू` तयार करण्याचे काम ‘गुगल`ने सुरू केले आहे.

Updated: Oct 7, 2013, 02:13 PM IST

www.24taas.com , पीटीआय, नवी दिल्ली
दूर अंतराच्या ऐतिहासिक स्थळांना फिरायला जायचंय पण पुरेसा वेळ नाही. चिंता करू नका. कारण येत्या काही दिवसांतच ‘गुगल मॅप` घेऊन येणारंय ऐतिहासिक स्थळांची दृश्यात्मक झलक! भारतातील शंभर ऐतिहासिक स्मारके आणि स्थळांचे, असे ‘स्ट्रीट व्ह्यू` तयार करण्याचे काम ‘गुगल`ने सुरू केले आहे.
सध्या ‘गुगल` कंपनीच्या ‘गुगल मॅप` या साइटवर सध्या फ्रान्समधील आयफेल टॉवर, अमेरिकेतील ग्रॅंड कॅनयॉन आणि जपानमधील माउंट फुजी, तसेच इतर ठिकाणांचे ‘स्ट्रीट व्ह्यू` पाहता येतात. ३६० अंशांच्या कोनात फिरणारी ही दृश्येद पाहताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्याचा भास होतो.
देशातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे पाहण्याचा अनुभव संगणकावर घरबसल्या घेता यावा, यासाठी ‘गुगल` आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने एकत्रितरित्या हा उपक्रम हाती घेतला आहे. ‘गुगल` आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागात करार झाला. त्यामुळे इंटरनेट युजर्सना या ऐतिहासिक स्थळांच्या "डिजिटल टुरिझम`वर जाता येईल. मात्र, हा प्रकल्प पूर्ण होण्यास किती काळ लागेल हे ‘गुगल`ने जाहीर केलेले नाही.
‘सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने या प्रकल्पासाठी शंभर स्थळांची यादी तयार केली आहे. त्यानुसार कुतुबमिनारच्या परिसरात ‘गुगल`च्या तंत्रज्ञांनी या पद्धतीने नुकतेच छायाचित्रण सुरू केले आहे.
गेल्या वर्षी सुरू झालेल्या ‘गुगल`च्या ‘वर्ल्ड ऑफ वंडर` या प्रकल्पात सध्या जगातील शंभर ठिकाणांचा समावेश आहे. ‘स्ट्रीट व्ह्यू`मध्ये संबंधित ठिकाणाचे ३६० अंशांच्या कोनातून पाहता येणारे चित्र उपलब्ध केले जाईल. हे छायाचित्र घेण्यासाठी वेगवेगळे कॅमेरे असलेल्या ‘स्ट्रीट व्ह्यू ट्रॅकर` या उपकरणाचा वापर केला जातो. ‘स्ट्रीट व्ह्यू` असलेले कुतुब मिनार हे भारतातील पहिले ऐतिहासिक स्थळ ठरणार आहे.
गुगल कल्चरल इन्स्टिट्यूटचे संचालक अमित सूद यांनी सांगितले की, ऐतिहासिक स्थळे पाहण्याचा जिवंत अनुभव देण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी अधिकृत चित्रण मिळावे यासाठी आम्ही पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, "युनेस्को`, वर्ल्ड मॉन्युमेंट फंड यासारख्या संस्थांसोबत करार करत आहोत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.