www.24taas.com, नागपूर
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या `पूर्ती पॉवर अँड शुगर`मधल्या घोटाळ्यांबद्दल केजरीवाल यांनी आवाज उठवल्यामुळे गडकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. कंपनी व्यवहार खात्याचे मंत्री वीरप्पा मोइली यांनी गडकरींच्या कंपनीवर गैरव्यवहाराचा आरोप झाल्यामुळे त्याबद्दल चौकशी करण्याची घोषणा केली आहे, तर भाजपचेच खासदार असणाऱ्या राम जेठमलानी यांनी गडकरींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
गडकरींनी आपण या कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा १४ महिन्यांपूर्वीच दिला असल्याचं स्पष्ट केलंय. यावेळी आपल्याकडे ३१०० रुपयांचेच शेअर्स असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजप अध्यक्ष नितीन गडकरींना अभय दिलंय. नितीन गडकरींना भाजपच्या अध्यपदी ठेवावे किंवा नाही हा भाजपचा अंतर्गत मामला आहे. याबाबत भाजपच काय तो निर्णय घेईल. अशी प्रतिक्रिया सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिलीय. संघ याबाबत हस्तक्षेप करणार नसल्याचं सांगून भागवतांनी गडकरींना अभयच दिल्याची चर्चा आहे. तर संघाचे प्रचारक मनमोहन वैद्य यांनी गडकरींवरील आरोप म्हणजे मीडिया ट्रायल असल्याचं सांगितलंय.