www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काश्मीरचं स्वप्न आज पूर्ण होतंय. काश्मीर खोऱ्यात कोणत्याही अडथळ्याविना आता प्रवास करता येणं शक्य होणार आहे.
बनिहाल ते काजीगुंड दरम्यान रेल्वे लिंकचं आज पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आज उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान आणि सोनिया गांधी संयुक्तपणे या रेल्वे रुळावरून धावणाऱ्या पहिल्या रेल्वेला सकाळी ११.५० मिनिटांनी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करतील.
बनिहाल ते काजीगुंड रेल्वेमार्गाचं वैशिष्ट्यं
> १८ किलोमीटर लांब असणाऱ्या या रेल्वेरुळाच्या साहाय्याने जम्मू बनिहाल आणि काश्मीरच्या काजीगुंडला जोडलं गेलंय.
> आता जम्मूहून लडाखला जाणाऱ्या पर्यटकांची १७-१८ तासांचा थकवणाऱ्या प्रवासातून सुटका झालीय. सहा ते सात तासांत ते श्रीनगर आणि लडाखला पोहचू शकतील.
> जम्मू ते काश्मीर हा भाग जोडणारा रेल्वेमार्ग एका भुयारातून जाणारा आहे. हे भुयार आता पूर्णत: तयार आहे.
> बनिहाल ते काजीगुंडपर्यंत जवळजवळ ११.२३ किलोमीटरचं हे भुयार देशातलं सगळ्यात लांब भुयार तर आशियातला तिसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं भुयार ठरलंय.
> या रेल्वेमार्गाचं खास वैशिष्ट्यं म्हणजे सर्व ऋतुंमध्ये म्हणजेच थंडीमध्येही हा मार्ग सुरू राहू शकेल. काश्मीरच्या खोऱ्यातून धावणारी ही पहिलीच रेल्वेसेवा असेल.
> बनिहाल ते काजीगुंडपर्यंत रस्त्यावरून ३५ किलोमीटरचा होणारा प्रवास ट्रेनमुळे केवळ १८ किलोमीटरचा झालाय.
> आठ डब्यांची ही रेल्वे २७ जूनपासून बनिहाल ते बारामुल्लापर्यंत धावणार आहे.
> बनिहाल – बारामुल्ला – बनिहाल ही रेल्वे दिवसातून पाच फेऱ्या पूर्ण करणार आहे.
> बनिहालहून पहिली ट्रेन सकाळी ७.१० वाजता तर बारामुल्लाहून सकाळी ७.३५ सुटेल
> हा प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी १,६९१ करोड रुपयांचा खर्च आलाय.
> काश्मीर खोऱ्यातून बनिहालला प्रवास करणाऱे प्रवासी बनिहालहून उधमपूरपर्यंत बस सेवेचा वापर करू शकतात.
> राजस्थानच्या वेगवेगळ्या भागांतून आता ट्रेन जम्मू किंवा उधमपूरपर्यंत जाते.
> उधमपूरपासून कटरापर्यंत रेल्वेमार्ग तयार आहे. येत्या सप्टेंबरपासून हा मार्ग सुरु होण्याची चिन्ह आहेत. श्रीनगरसाठी सरळ ट्रेन सेवा २०१७ पर्यंत सुरु होऊ शकते. सध्या बनिहालपासून कटरापर्यंत चिनाब नदीवर बांधल्या जाणाऱ्या पुलाचं काम पूर्ण होऊ शकलेलं नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.