शरद पवारांचं पंतप्रधानांना पत्र, मुख्यमंत्र्यांना चिमटे

मुंबईसाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती नेमण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी विरोध दर्शवलाय. याबाबत त्यांनी शरद पवार यांनी एक पत्रही लिहिलंय. 

Updated: Dec 19, 2014, 09:36 AM IST
शरद पवारांचं पंतप्रधानांना पत्र, मुख्यमंत्र्यांना चिमटे title=

नवी दिल्ली : मुंबईसाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती नेमण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी विरोध दर्शवलाय. याबाबत त्यांनी शरद पवार यांनी एक पत्रही लिहिलंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही जबाबदारी स्वीकारू नये अशी विनंती पवार यांनी आपल्या पत्राद्वारे केलीय. अन्य शहरांबाबत अशी समिती का नेमत नाही? असा सवाल उपस्थित करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटेही काढलेत. 

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मुंबईसाठी विशेष समिती नेमण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय. यावरून विधीमंडळातही फडणवीसांनी खुलासा केलाय. त्यानंतर पवारांनी मोदींना हे सविस्तर पत्र लिहिलंय. विशेष म्हणजे, मोदी मुळचे गुजराती असून मुंबईमध्ये त्यावरून वाद होऊ शकतो, असा ओझरता उल्लेखही त्यांनी केलाय.

नेमकं काय म्हटलंय पवारांनी आपल्या पत्रात... 
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिलाय. या प्रस्तावामुळे संघराज्य पद्धतीला धक्का बसणार आहे. संघराज्य पद्धतीत केंद्राला कमी आणि राज्याला जास्त अधिकार असतात. आपण दोघेही मोठ्या राज्यांचे मुख्यमंत्री राहिलेलो आहोत आणि याबाबत आपल्याला पुरेशी कल्पना आहे. त्यांचं हे विधान दुर्लक्ष करण्याजोगं असलं तरी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी याबाबत भाष्य केलंय. याबाबत कॅबिनेटचं शिक्कामोर्तब होणं आवश्यक असताना सरकारमधल्या प्रमुख सहकारी पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. 

पंतप्रधान या नात्यानं तुमच्यावर सगळ्या देशाची जबाबदारी आहे. त्यामुळे एका शहराकडे तुम्ही विशेष लक्ष देणं अयोग्य आहे. मुंबईच का, चेन्नई किंवा शिलाँग किंवा दिल्ली का नाही? नवोदित आंध्रप्रदेश राज्याच्या नव्या दोन राजधान्या का नाहीत? गांधीनगर किंवा मग अगदी नागपूर का नको? तुम्ही एकाच शहराकडे विशेष लक्ष द्यावं, असं मुख्यमंत्री कसं सुचवू शकतात? 

महाराष्ट्र, गुजरातमध्ये काही मुद्दे वादाचे आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून वाद झालेला मला वैयक्तिकरित्या आवडणार नाही... 

मुंबईच्या विकासावर राजकारण नको, असं फडणवीस म्हणाले आहेत. मात्र, त्यांच्या जागी कुणीही असता तरी ही घोषणा करून मुख्यमंत्रीच राजकारण करत असल्याचं मी म्हणालो असतो. 

दोन वर्षांनी होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ही तयारी असल्याचं सहज म्हटलं जाऊ शकतं... पण मी देवेंद्रना ओळखतो, त्यांना महाराष्ट्राचा अभिमान आहे, हे मला ठाऊक आहे... त्यामुळे मी असं म्हणणार नाही! 

या सगळ्याचा विचार करून मुख्यमंत्र्यांची ही विनंती आपण मान्य करू नये, अशी विनंती मी आपल्याला करत आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.