लाच दिली नाही म्हणून GRP जवानांनी राष्ट्रीय खेळाडूला ट्रेनमधून फेकलं

लाच दिली नाही म्हणून एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला जीआरपीच्या दोन जवानांनी चालत्या ट्रेनमधून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेत खेळाडूचा मृत्यू झालाय.

Updated: Jul 24, 2015, 01:33 PM IST
लाच दिली नाही म्हणून GRP जवानांनी राष्ट्रीय खेळाडूला ट्रेनमधून फेकलं title=

उत्तरप्रदेश : लाच दिली नाही म्हणून एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला जीआरपीच्या दोन जवानांनी चालत्या ट्रेनमधून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेत खेळाडूचा मृत्यू झालाय.

मिळालेल्या माहितीनुसार, मथुराच्या लक्ष्मीनगरचा रहिवासी असलेला होशियार सिंह हा तलवारबाजीचा राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू होता. आपल्या मुलाचं मुंडन करून तो पॅसेंजर ट्रेननं आपल्या घरी परतत होता. त्याची पत्नी आणि आई याच ट्रेनमध्ये महिला कोचमध्ये बसल्या होत्या तर तो स्वत: जनरल कोचमध्ये बसला होता. 

पण, गाडी सुरू झाल्यावर काही वेळानं अचानक त्याच्या पत्नीची तब्येत बिघडली. त्यामुळे पत्नीला पाहण्यासाठी त्याला महिला कोचमध्ये जावं लागलं. यावेळी, तिथं उपस्थित असलेल्या जीआरपी जवानांनी त्याला महिला कोचमध्ये जाण्यापासून थांबवलं.

या जवानांनी होशियारला महिला कोचमध्ये जाण्यासाठी 200 रुपयांची लाचही मागितली. जेव्हा त्यानं लाच द्यायला नकार दिला तेव्हा या जवानांशी त्याची मारामारीही झाली. यामुळे चिडलेल्या जवानांनी होशियारला चालत्या ट्रेनमधून धक्का दिला, असा आरोप होशियारच्या कुटुंबीयांनी केलाय. 

जवानांनी मात्र, होशियार प्लॅटफॉर्मवर पाणी घेण्यासाठी उतरला होता पण परत चढताना मात्र त्याचा अपघात झाला, असं म्हटलंय.  

होशियारनं 2005 मध्ये तलवारबाजीत कांस्य पदक पटकावलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.