नॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल यांना जामीन मंजूर

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधींना जामीन मंजूर करण्यात आलाय. प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला. 

Updated: Dec 19, 2015, 03:50 PM IST
नॅशनल हेराल्ड प्रकरण : सोनिया, राहुल यांना जामीन मंजूर title=

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधींना जामीन मंजूर करण्यात आलाय. प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला. 

या प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी कोर्टात हजर झाले होते. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोर्ट परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. कोर्टाने सुनावणीदरम्यान दोघांनाही जामीन मंजूर केला. तसेच या प्रकरणाची सुनावणी २० फेब्रुवारीला होणार असल्याचेही स्पष्ट केले. 

दरम्यान, नॅशनल हेराल्ड सुनावणीच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलने केली. मुंबईच्या खेरवाडी परिसरात झालेल्या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माजी खासदार प्रिया दत्त यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ वाराणसी, जयपूर, कानपूर, पाटणा, लखनऊ, बंगळुरु, कोइम्बतूर अशा शहरांमध्येही आंदोलने करण्यात आली.

काय आहे हे प्रकरण... 

देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी सन १९३८ मध्ये ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र सुरू केले. ते सन २००८ मध्ये बंद पडले. त्यानंतर सन २०१० मध्ये ‘यंग इंडिया’ या नव्याने स्थापन झालेल्या कंपनीने हे वृत्तपत्र विकत घेतले. या व्यवहारासाठी काँग्रेसने तब्बल ९० कोटी रुपये कर्जाऊ दिले होते. 

काँग्रेसकडून कर्ज घेऊन हे वृत्तपत्र ताब्यात घेण्याचा व्यवहार हा या वृत्तपत्राच्या मालमता ताब्यात घेण्यासाठी करण्यात आला असून तो बेकायदेशीर आहे; असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.