नवी दिल्ली : काँग्रेसच्याच योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राबवत असल्याचा घणाघाती आरोप, कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी केला. केंद्रातील एनडीए सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असून यूपीए सरकारने राबवलेली धोरणे आपल्या नावावर चालवत आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.
नवीन भूसंपादन अध्यादेश, शेतक-यांच्या प्रश्नावर देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही सोनिया गांधी यांनी दिला.
कॉँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत पक्षाच्या भावी कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत गांधी यांनी एनडीए सरकारवर जोरदार टीका केली. या वेळी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अंबिका सोनी या उपस्थित होत्या.
समाजात तेढ निर्माण करणारी वादग्रस्ते विधाने करूनही मोदी हे आपल्या मंत्रिमंडळातील नेत्यांना आवर घालत नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या काळात राबवण्यात आलेल्या मतांच्या ध्रुवीकरणाचे धोरण भाजपाने कायम ठेवले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
देशातील लोकशाही संस्थांना सध्या कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत मोदी सरकारने १० अध्यादेश काढले आहेत. घाईघाईने अध्यादेश काढण्यामागे अन्य हेतू आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करताना गांधी म्हणाल्या की, जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करावेत. विशेषत: नवीन भूसंपादन अध्यादेश आणि शेतक-यांच्या प्रश्नावर कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडावे, असंही यावेळी सोनिया गांधी यांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.