गोध्रा हत्याकांड : नरेंद्र मोदी ठरले `मिस्टर क्लीन`

गुलबर्ग सोसायटी हत्याकांड प्रकरणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट मिळालीय. हा मोदींसाठी मोठा दिलासा मानला जातोय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 26, 2013, 06:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
गुलबर्ग सोसायटी हत्याकांड प्रकरणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट मिळालीय. हा मोदींसाठी मोठा दिलासा मानला जातोय. अहमदाबादच्या कोर्टानं झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावलीय त्यामुळे ‘एसआयटी’च्या क्लोझर रिपोर्टला हिरवा कंदील मिळालाय.
विशेष तपास पथकानं (एसआयटी) गोध्र हत्याकांड आणि गोध्रानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लिन चीट दिली होती. याविरोधात झाकिया जाफरी यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर, निर्णय देताना, एसआयटीचा हा निर्णय योग्यच होता, असं अहमदाबादमधील न्यायालयानं म्हटलंय. न्यायमूर्ती बी. जी. गणात्रा यांनी गुरुवारी दुपारी सव्वाचार वाजता निर्णय दिला.
गोध्रापश्चात उसळलेल्या दंगलींप्रकरणी सुरुवातीला मोदींसह ६१ राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र चौकशीनंतर हा आकडा ५६ पर्यंत खाली आला. या दंगलींमध्ये जाफ्री यांचे पती आणि कॉंग्रेसचे माजी खासदार एहसान जाफ्री मृत्युमुखी पडले होते. दंगली घडवून आणण्यासाठी कट रचल्याचा आणि दंगली आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न न करता आपली जबाबदारी टाळल्याचा आरोप मोदींवर करण्यात आला होता. गोध्रा हत्याकांडानंतर संपूर्ण गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींप्रकरणी गुलबर्ग सोसायटी हत्याकांडामध्येच जाफरी यांचे पती मृत्युमुखी पडले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे संचालक आर. के. राघवन यांच्या नेतृत्त्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापन केली होती. विशेष तपास पथकाने २०११ मध्ये दिलेल्या अहवालात मोदी यांना क्लिन चीट देण्यात आली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.