मोदींचं नव्या ‘ABCD’द्वारं काँग्रेसवर टीकास्त्र...

राजस्थानची राजधानी जयपूर इथं आपल्या पहिल्या रॅलीला संबोधित करत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि केंद्रसरकावर टीकास्त्र सोडलं. राजस्थान निवडणुकीच्या प्रचाराचं मोदींनी रणशिंग फुंकलं. काँग्रेस सरकार आणि भ्रष्टाचार याची नवीन एबीसीडीच मोदींनी मांडली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 10, 2013, 03:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
राजस्थानची राजधानी जयपूर इथं आपल्या पहिल्या रॅलीला संबोधित करत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि केंद्रसरकावर टीकास्त्र सोडलं. राजस्थान निवडणुकीच्या प्रचाराचं मोदींनी रणशिंग फुंकलं. काँग्रेस सरकार आणि भ्रष्टाचार याची नवीन एबीसीडीच मोदींनी मांडली.
जयपूर इथं एका सभेत भाषण करत मोदींनी निवडणूक प्रचाराचं बिगुल वाजवलं. काँग्रेसमध्ये आता काही दम उरला नाही, कारण तिथं आता फक्त भ्रष्टाचाऱ्यांचीच प्रगती होते, अशी टीका मोदींनी केली. देशाच्या सद्य परिस्थितीला काँग्रेस सरकारच जबाबदार असून काँग्रेसचं नेतृत्व देशाला रसातळाला नेतंय, असंही मोदी म्हणाले. रुपयाची घसरण होत असतांना काँग्रेसला फक्त आपलं सरकार वाचवण्याची चिंता आहे, देशाची नाही असं म्हणत मोदींनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही टीका केली.
काँग्रेस सरकारच्या कारनाम्यामुळं विद्यार्थ्यांना आता नवीन एबीसीडी शिकायला मिळेल, असं मोदी म्हणाले. ए फॉर ‘आदर्श’, बी फॉर ‘बोफोर्स स्कॅम’, सी फॉर ‘सीडब्लूजी स्कॅम’ आणि डी फॉर ‘दामाद का कारोबार’ अशी नवीन एबीसीडी मोदींनी शिकवली.
राजस्थानमध्ये सत्तापरिवर्तन करण्याची विनंती मोदींनी मतदारांना केली. यावेळी वसुंधरा राजेंच्या नेतृत्वात भाजप बहुमतानं निवडणूक जिंकेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. राज्यात ४० टक्के मतदार हे युवक आहेत. ते आपल्यासोबत असल्याचं मोदी म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.