नितेशला वाचविण्यासाठी `बाबा`नं फिरवला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना फोन

टोल नाक्यावर दादागिरी करून टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या नितेश राणेंना पोलिसांनी अटक केल्यानंतर, नितेशला तिथून बाहेर काढण्यासाठी त्याच्या वडिलांनी म्हणजेच उद्योगमंत्री नारायण राणे यांनी थेट गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला होता.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 5, 2013, 11:53 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पणजी
टोल नाक्यावर दादागिरी करून टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या नितेश राणेंना पोलिसांनी अटक केल्यानंतर, नितेशला तिथून बाहेर काढण्यासाठी त्याच्या वडिलांनी म्हणजेच उद्योगमंत्री नारायण राणे यांनी थेट गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला होता.
मुख्य म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीच ही माहिती उघड केलीय. ‘नितेश राणेला गोवा पोलिसांनी अटक केल्यानंतर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपल्याला फोन केला होता... आणि माझ्या मुलाला सोडवा, अशी विनंतीही केली’ असं पर्रिकर यांनी म्हटलंय.
गोवा-महाराष्ट्र सीमेवरील चेकनाक्यावर नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्यानंतर गोवा पोलिसांनी नितेश राणेसह नऊ जणांना अटक केली होती. या प्रकारानंतर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून, शक्य असेल तर नितेशला सोडा, अशी विनंती केली. परंतु ‘आपण त्यांना कोर्टात जा, असं सौम्य शब्दात सांगून त्यांची विनंती अमान्य केली’ असं पर्रिकर यांनी म्हटलंय.
‘नितेश राणेंच्या राड्यामुळे गोवा सरकारचं सहा ते सात लाख रुपयांचं नुकसान झालंय. या प्रकरणी कायद्यानुसार सर्व कारवाई होईल. गोव्यात अशा प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही’ असंही पर्रिकर यांनी नारायण राणे यांना यावेळी सुनावलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.