हायटेक मोदींचे खासदार आता ‘व्हॉटसअप’वर!

संसद अधिवेशनातील भाजप खासदारांची कामगिरी पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच संतापलेत. बैठकांना दांडी मारणाऱ्या खासदारांना वठणीवर आणण्यासाठी मोदींनी एक शक्कल लढवलीय.

Updated: Jul 30, 2014, 11:36 PM IST
हायटेक मोदींचे खासदार आता ‘व्हॉटसअप’वर! title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : संसद अधिवेशनातील भाजप खासदारांची कामगिरी पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच संतापलेत. बैठकांना दांडी मारणाऱ्या खासदारांना वठणीवर आणण्यासाठी मोदींनी एक शक्कल लढवलीय.

लोकसभा आणि राज्यसभेतील भाजप खासदारांच्या कामगिरीवर पंतप्रधान मोदी नाखूष आहेत. अनेक खासदार संसदेत हजरच राहत नाहीत, सभागृहातल्या चर्चेत सहभाग होणं, तर फारच दूर... अशा दांडीबहाद्दरांसाठी आता पंतप्रधानांनी खास मोदी स्टाइलनं कानपिचक्या दिल्यात. संसदेतच नव्हे, तर भाजपच्या बैठकांनाही गैरहजर राहणाऱ्या खासदारांचा रेकॉर्ड ठेवा, अशा कडक सूचना त्यांनी संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांना दिल्यात. 

एव्हढंच नव्हे तर भाजप खासदारांसाठी खास व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिलेत. मग काय, या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी व्यंकय्या नायडू तत्काळ ग्रुप अॅडमिन झाले. त्यांनी 50-50 भाजप खासदारांचे वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत. यापुढं पक्षाच्या सर्व बैठकांची आणि कार्यक्रमांची माहिती व्हॉट्स ग्रुपवरूनच भाजप खासदारांना दिली जाणार आहे. बैठकांना हजर राहणार की नाही, याबाबत होय किंवा नाही असा रिप्लाय पाठवण्याचं बंधन खासदारांना घालण्यात आलंय. 

एव्हढंच नाही तर व्हॉट्सअप व्यतिरिक्त फेसबुकवर भाजप खासदारांसाठी एक विशेष पेजही तयार करण्यात येणार आहे. एव्हढं करूनही जे खासदार दांडीयात्रा सुरूच ठेवतील, त्यांची हजेरी दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी घेणार आहेत. संसदेतील खासदारांच्या कामगिरीवर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल, अशी तंबीही त्यांना देण्यात आलीय. 

आता सोनारानंच कान टोचल्यानं भाजप खासदार संसदेत उपस्थित राहतील खरे... पण मोबाईल फोनवरच व्हॉट्सअपचे मेसेज वाचण्यात आणि रिप्लाय करण्यातच त्यांनी वेळ घालवला नाही, म्हणजे मिळवली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.