याकूब मेमनच्या फाशीवर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब!

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब अब्दुल रजाक मेमन याची दया याचिका फेटाळून लावलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 22, 2014, 08:23 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब अब्दुल रजाक मेमन याची दया याचिका फेटाळून लावलीय.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालयानं केलेल्या शिफारशींना नजरेसमोर ठेऊन राष्ट्रपतींनी मेमन याची दया याचिका फेटाळून लावण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रपतींच्या या निर्णयाबाबत महाराष्ट्र सरकारला सूचना देण्यात आलीय. याकूबला सध्या नागपूरच्या तुरुंगात ठेवण्यात आलंय.
त्यामुळेच, कसाब आणि अफझल गुरू या दहशतवाद्यांप्रमाणेच कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार याकूबही फासावर लटकणार, हे आता निश्चित झालंय. त्याला फाशी कधी द्यायची, याचा निर्णय मात्र महाराष्ट्र सरकारकडे सोपवण्यात आलाय.
व्यावसायानं चार्टर्ड अकाऊंटंट आणि सध्या भरार असलेला दहशतवादी टायगर मेमन याचा भाऊ याकूब मोमन याला 2007 साली टाडा कोर्टानं दोषी करार देत फाशीची शिक्षा सुनावली होती. मुंबई बॉम्बस्फोटांचा कट रचण्यात आणि तो प्रत्यक्षात आणण्यात दाऊद आणि टायगर मेमन यांच्याइतकाच, टायगरचा भाऊ याकूब मेमनचाही हात होता. त्यानंतर, गेल्या वर्षी मार्चमध्ये सुप्रीम कोर्टानंही त्याची शिक्षा कायम ठेवली होती. मात्र, त्याच्या दहा साथीदारांची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टानं जन्मठेपेत बदलली होती. यानंतर, ऑक्टोबर 2013 मध्ये याकूबनं राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती.
याकूबला 1994 मध्ये काठमांडू विमानतळावरून अटक करण्यात आली होती. मुंबईत अनेक ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये 257 लोक मारले गेले होते तर 713 जण जखमी झाले होते. दरम्यान, प्रणव मुखर्जी यांनी आत्तापर्यंत 11 दया याचिका फेटाळल्या असून आणखी चार याचिकांवर त्यांना निर्णय घ्यायचा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.