www.24taas.com,गुडगाव
कामगार आणि व्यवस्थापनातील वादामुळे हरियानातील गुडगावमधील गेल्या महिनाभरापासून बंद असलेला मारुती सुझुकीचा मनेसर येथील कारखाना कडक पोलीस बंदोबस्तात आज मंगळवारी उघडण्यात आला.
मारुती सुझुकी प्लांटमधील सुपरव्हायजर ज्जिया लालला जातिवाचक शिवीगाळ केल्याने कामगार आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. त्यातूनच १८ जुलै रोजी वाद निर्माण झाला होता. त्यात मनुष्यबळ विकास व्यवस्थापकाचा मृत्यू झाला होता. तर, शंभर जण जखमी झाले होते. जखमींमध्ये काही जपानी अभियंत्यांचाही समावेश होता. त्यामुळे हा प्लांट २१ ऑगस्टपर्यंत बंद राहील, असे कंपनीने २१ जुलै रोजी जाहीर केले होते. आज कारखाना पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आला. पहिल्या पाळीचे दहाहूनही कमी कामगार या वेळी कामावर हजर होते.
आम्ही तीनशे कामगारांना सोबत घेऊन काम सुरू करत आहोत. सुरवातीला आम्ही सकाळी आठ ते सायंकाळी साडेचार या एकाच पाळीत काम करणार आहोत, अशी माहिती मारुती सुझुकीचे मुख्य प्रशासन अधिकारी एस. वाय. सिद्धीकी यांनी दिली.