माओवादी-दहशतवाद्यांची हातमिळवणी जाहीर

देशातल्या माओवादी संघटना काश्मिर आणि इतर भागातल्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची चर्चा नेहमीच असते. मात्र, आता यात तथ्य आढळलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 30, 2014, 03:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशातल्या माओवादी संघटना काश्मिर आणि इतर भागातल्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची चर्चा नेहमीच असते. मात्र, आता यात तथ्य आढळलंय. सीपीआय (माओवादी) या नक्षलवादी संघटनेच्या पुस्तकाच्या माध्यमातून हे जळजळीत सत्य आता बाहेर आले आहे. एव्हढंच नाही तर आसामसारख्या राज्यात माओवादी हातपाय पसरत असतानाच आता त्यांनी युरोपीय देशातल्या माओवादी संघटनांशी हातमिळवणी केलीय.
भारतातील नक्षलवाद्यांना पाकिस्तान, चीनसारख्या देशातून शस्त्र आणि इतर सामग्रीचा पुरवठा होतो, अशी चर्चा नेहमीच होते. सरफरोशसारख्या सिनेमातूनही ही बाब अनेकदा अधोरेखित करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आता यावर शिक्कामोर्तब झालंय. सीपीआय (माओवादी) या नक्षलवादी संघटनेच्या ‘स्ट्रॅटेजी अँन्ड टॅक्टीक्स ऑफ द इंडिअन रिव्होल्युशन’ या पुस्तकाच्या माध्यमातून हे जळजळीत सत्य आता बाहेर आलंय. बिहारपासून ते तेलंगणपर्यंत ‘रेड कॉरीडर’ स्थापन करण्याचा प्रयत्न माओवादी संघटनांचा आहे. ११ राज्यात माओवादी संघटनांचा प्रभाव आहे. तो वाढवा यासाठी माओवादी काश्मीर, ईशान्य भारतातील फुटीरतावादी संघटनांशीही ते संधान साधत आहेत. २००७ मध्ये झालेल्या माओवादी संघटनांच्या बैठकीदरम्यान हे पुस्तक छापले गेले.
माओवाद्यांचे विचार दिर्घकालीन लढाईचे आहेत. त्याच दृष्टीने त्यांचे हे प्रयत्न आहेत. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, फिलिपाइन्स, तुर्कीस्तान आणि युरोप खंडातील स्वीडनसारख्या देशातदेखील माओवादाशी संबंध असलेल्या संघटना आहेत. संख्या कमी असली तरीही तिथे या चळवळीचे समर्थक आहेत आणि त्या देशातील संघटना भारतातल्या माओवादी संघटनांकडे जागतिक नेतृत्व करण्याच्या दृष्टीने बघत असल्याचंही या पुस्तकाने स्पष्ट केलंय.
माओवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान हे पुस्तक पोलिसांना सापडलंय. हे पुस्तक पोलिसांच्या हाती लागल्याने, एकूणच माओवादी कशाप्रकारे विचार करतात आणि त्यांचे मनसुबे किती घातक आहे हेही आता स्पष्ट झालंय.