www.24taas.com, अलाहाबाद
भारतात अलाहाबादमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात यंदा १० कोटी भाविक येण्याचा अंदाज वर्तवला जातोय. हा आकडा चकीत करणारा आहे कारण, जगभरात १५८ देशांची लोकसंख्या एक कोटीपेक्षा कमी आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा कुंभमेळा आता अमेरिकेतल्या हार्वर्ड युनिवर्सिटीत अभ्यासाचा विषय बनला आहे.
कुंभमेळ्याच्या आयोजनातल्या आर्थिक बाजूचा आणि संगमनगरी अलाहबादच्या इतर धार्मिक आयोजनाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील बहुप्रतिष्ठित हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे काही संशोधक भारतात दाखल झालेत. हार्वर्डचे आर्ट्स अँड सायन्स, स्कूल ऑफ डिझायन, हार्वर्ड बिझनेस स्कूल, स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, हार्वर्ड मेडिकल स्कूल, हार्वर्ड डिव्हिनिटी स्कूल आणि हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटचे एक पथक अलाहबादचा दौरा करणार आहे. हे शोध पथक महाकुंभच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार आहे. या अभ्यासाला ‘मॅपिंग इंडियाज कुंभमेळा’ असे नाव देण्यात आले आहे.
भूतान, हंगेरी, आयर्लंड, मालदीव या देशांची लोकसंख्या एक कोटींपेक्षा कमी आहे. या देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त लोक अलाहाबादेत दाखल झालेत. दर १२ वर्षांनी आयोजित होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात लाखो लोक सहभागी होतात. कुंभमेळ्याच्या निमित्ताने एक तात्पुरते शहर या ठिकाणी वसविण्यात येते. यात श्रद्धाळू आणि पर्यटक एक महिन्यांपेक्षा अधिक काळ वास्तव्यास असतात.