www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसवर अनेक आरोप झाले आहेत आणि होत आहेत. संकटे आली मात्र तरीही पक्षाने अनेक संकटे पचवली आहेत. आम्ही आगामी लोकसभा निवडणुकांच्या लढाईसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. तालकटोरा स्टेडियमवर काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनात त्या बोलत होत्या.
काँग्रेसच्या आजच्या बैठकीत अध्यक्षा सोनिया गांधींनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज असल्याचा नारा दिलाय. मात्र याचवेळी त्यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत कालच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेतलेला निर्णय अंतिम असल्याचं स्पष्ट केलंय. देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. भ्रष्टाचाराविरोधी लढ्यात लोकपाल हे सर्वांत मोठे शस्त्र असल्याचे सांगत आगामी काळात भ्रष्ट्राचार विरोधी विधेयके मंजूर करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. आमच्या सरकारपेक्षा इतर कोणत्याही सरकारने मोठे काम केलेले नाही, असे त्या म्हणाल्या.
राहुल गांधींबाबतच्या निर्णयात कोणताही बदल करण्यात येणार नसून ते काँग्रेसचे प्रचारप्रमुखपदच सांभाळणार असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केलाय. मात्र त्यांच्या य़ा वक्तव्यानंतर बैठकीतल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याची आक्रमकरीत्या मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळं अखेर राहुल गांधींना कार्यकर्त्यांचं सांत्वन करावं लागलं.
दरम्यान, आपल्या मनात काय आहे ते आपण दुपारी साडे तीन वाजताच्या भाषणात स्पष्ट करणार आहोच असं राहुल यांनी सांगितलं. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. मात्र राहुल गांधी आपल्या नेहमीच्या धक्कातंत्रानुसार काही वेगळी भूमिका मांडतात की कार्यकारिणीचा निर्णय मान्य करता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी दिल्लीत सध्या सुरु असलेल्या AICC च्या बैठकीत राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे , या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्ते कमालीचे आग्रही आहेत. सोनिया गांधी यांच्या भाषणानंतरही काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरुच होता. पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी या कार्यकर्त्यांना शांत बसवण्याचा प्रयत्न केला, तरीही हा गदारोळ थांबत नव्हता.
अखेर राहुल गांधी यांनाच या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. दुपारी साडेतीन वाजता होणा-या भाषणात आपलं मनोगत मांडणार असून त्यावेळी सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील असं राहुल यांनी सांगितलं. त्यामुळे आता दुपारच्या भाषणात राहुल काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.