गुप्तहेर म्हणून अटक केलेले कुलभूषण जाधव उद्योजक

भारतीय गुप्तहेर संघटनेचे हस्तक म्हणून अटक केलेले कुलभूषण जाधव यांचा भारतीय गुप्तचर संस्थेशी काही संबंध नाही, ते उद्योजक आहेत, त्यांच्या मालकीचे एक छोटेसे जहाज आहे. जाधव यांना पाकिस्तानने बलुचिस्तानात अटक केली आहे, ते भारताचे गुप्तहेर असल्याचे म्हटले आहे.

Updated: Mar 27, 2016, 01:01 PM IST
गुप्तहेर म्हणून अटक केलेले कुलभूषण जाधव उद्योजक  title=

नवी दिल्ली : भारतीय गुप्तहेर संघटनेचे हस्तक म्हणून अटक केलेले कुलभूषण जाधव यांचा भारतीय गुप्तचर संस्थेशी काही संबंध नाही, ते उद्योजक आहेत, त्यांच्या मालकीचे एक छोटेसे जहाज आहे. जाधव यांना पाकिस्तानने बलुचिस्तानात अटक केली आहे, ते भारताचे गुप्तहेर असल्याचे म्हटले आहे.

कुलभूषण जाधव यांना कदाचित आमिष दाखवून बलुचिस्तानात नेले असावे, आणि त्याच्याआधारे हस्तक पकडल्याचे नाटय़ पाकिस्तानने रचले असावे, अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिलीय.

जाधव यांचा इराणी बंदरावरून माल पाकिस्तानात आणण्याचा व्यवसाय आहे आणि त्यांचा रॉशी काही संबंध नाही. ते नौदलातून निवृत्त झालेले अधिकारी असल्याचा पुरावा नाही. 

जाधव हे चुकून पाकिस्तानच्या सागरी हद्दीत गेले असावेत व त्यामुळे त्यांच्यावर गैरसमजातून आरोप ठेवले असावेत असे सांगण्यात आले. 

अब्बास आणि इराणमधील छबबार बंदरादरम्यान मालवाहतूक करण्याचे काम जाधव करतात. त्यांच्या मालकीचे छोटे जहाज आहे. ते अपघाताने पाकिस्तानी सागरी हद्दीत गेले की पाकिस्तानने त्यांना फूस लावून बोलावून घेतले याची चौकशी होण्याची गरज आहे. 

भारताने पाकिस्तानकडे जाधव यांच्याशी राजनैतिक संपर्क प्रस्थापित करू देण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानने तसे करण्यास अजून मंजुरी दिलेली नाही. भारताने काल असे सांगितले होते की, अटक करण्यात आलेली व्यक्ती नौदलातून मुदतपूर्व निवृत्त झालेली असून त्यांचा सरकारशी काही संबंध नाही. 

जाधव यांनी बलुचिस्तानात दहशतवादी कारवायांना उत्तेजन दिले असा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. या घटनेनंतर उच्चायुक्त गौतम बंबवाले यांना बोलावून पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी त्यांना निषेधाचा खलिता दिला. जाधव यांचा कराची आणि बलुचिस्तानात अशांतता माजवण्यात हात आहे असा आरोप पाकिस्तानने केला आहे.

मुंबईच्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा मुंबई: कुलभूषण जाधव हे मुंबई पोलीस दलातील माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जाधव यांचे पुत्र आहेत. सुधीर जाधव हे काही वर्षांपूर्वी मुंबई पोलीस दलातून निवृत्त झाले होते.

कुलभूषण जाधव यांनी नौदलातून विहित वयोमानाअगोदरच सेवानिवृत्ती घेतली होती. त्यांचा भारत सरकारशी आता काहीही संबंध नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.