www.24taas.com, झी मीडिया, छत्तीसगड
छत्तीसगडमधल्या कोरबा जिल्ह्यातील आदिवासी मुंडा समाजात एक जगावेगळी परंपरा आजही कायम असलेली दिसते. इथं मुलांना ग्रह दोषातून मुक्त करण्यासाठी त्यांचा विवाह कुत्र्यासोबत केला जातो.
उडिया भागात मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी पारंपरिक गीतांसहीत अगदी पाळण्यातल्या मुलांपासून ते पाच वर्षांपर्यंतच्या आठ मुलांचं लग्न लावलं गेलं. या चिमुरड्यांसोबत नवरा आणि नवरीच्या रुपात कुत्र्यांना बसवण्यात आलं होतं. या आनंदी वातावरणात अनेक सुमधूर गीतंही कानी पडत होती आणि या गाण्यांवर नृत्यही सुरू होतं.
इथल्या आदिवासी समाजाच्या म्हणण्यानुसार, तान्हुल्या बालकांचे पहिले वरचे दोन दुधाचे दात येतात, तेव्हा त्यांना ग्रहदोष लागतो. त्यामुळे त्यांनी वयाची पाच वर्ष पूर्ण करण्याच्या आधीच या मुलांचं लग्न कुत्र्यांसोबत लावलं जातं. हे लग्न साधं-सुधं नाही तर मोठ्या धूमधडाक्यात होतं. यावेळी लहानग्या वधु-वरांना तर सजवलं जातंच सोबत कुत्र्यांनाही सजवलं जातं.
वयस्कर व्यक्ती पूजेसोबतच मुलांना आणि कुत्र्यांना हळद लावतात आणि लग्न लावतात. लग्नसोहळा पार पडल्यानंतर समाजातील महिला पारंपरिक गीत गात नाचत-नाचत नवरा-नवरींना घरी घेऊन जातात. तिथं त्यांचे पाय धुवून त्यांना घरात प्रवेश दिला जातो. कुत्र्यांना खायला दिलं जातं आणि याचा रात्रभर उत्सव साजरा केला जातो.
ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे मुलांनी वयाची पाच वर्ष पूर्ण करण्याआधीच त्यांचं लग्न कुत्र्यांशी लावलं जाणं आवश्यक आहे. असं केलं नाही तर तरुण वयात लग्न करणाऱ्या जोडप्यांना ग्रहदोष लागतो... आणि कुटुंबीयांसोबत अनिष्ट गोष्टी घडतात. इतकंच नव्हे तर नवजोडप्याचा मृत्यूही संभव असतो, असं इथले लोक मानतात.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.