www.24taas.com,नवी दिल्ली
आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे प्रति आव्हान केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी दिले आहे. इंडिया अगेस्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी खुर्शीद यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र, खुर्शीद यांनी केलेला खुलासा योग्य नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
खुर्शीद यांच्या पत्नी लुईस यांच्यातर्फे चालवल्या जाणा-या `झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्टने` उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या अनेक कागदपत्रांवर खोट्या सह्या करून लाखो रुपयांचे अनुदान लाटल्याचा आरोप करण्यात आला होता. हाच मुद्दा पकडून केजरीवाल यांनी खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच नवी दिल्लीत आंदोलन केले.
आज सकाळी दिल्ली विमानतळावर इंडिया अगेस्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी खुर्शीद यांचा निषेधही केला.यावेळी राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर खुर्शीद यांनी सायंकाळी पत्नीसह पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार करताच खुर्शीद यांनी पत्रकार परिषद आटोपती घेत, संताप व्यक्त केला.
अपंगांच्या संस्थेचा निधी वापरल्याचा आरोप केजरीवाल यांनी करून उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव यांच्या सरकारने या प्रकरणी चौकशी करून अहवालही सादर केला आहे. त्यामुळे खुर्शीद यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे.
अपंग व्यक्तींसाठी आरोग्य शिबिरे न घेताच सरकारी निधी लाटल्याचा आरोप लुईस आणि सलमान खुर्शीद यांच्यावर करण्यात आला होता. त्यावर त्यांनी शिबिरे घेतली असल्याचा दावा करत त्याची छायाचित्रे सादर केली. तसेच कॅगसह कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही रस्त्यांवरील लोकांना उत्तर देणार नाही. आमचे सरकार माझ्या भवितव्याचा निर्णय घेईल, असे खुर्शीद यांनी बोलताना स्पष्ट केले. तसेच आरोप करणा-या टी व्ही चॅनेलविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही ते म्हणाले.