www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना औपचारिकरित्या सार्वजनिक चर्चेचं आमंत्रण दिलंय. या चर्चेत सामान्य जनतेचाही सहभाग असेल आणि ते दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्या उमेद्वारांना सरळ सरळ प्रश्न विचारू शकतील.
केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, याअगोदरही मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना सार्वजनिक चर्चेचं आमंत्रण दिलं होतं, पण त्यांनी ते धुडकावून लावलं. यामुळे काही संपादकांच्या सल्ल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांना औपचारिक रुपात आमंत्रित केलंय.
केजरीवाल यांनी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांना लिहिलेल्या एका पत्रात, ‘मी तुम्हाला हे पत्र लिहितोय, कारण काही संपादकांनी मला हा सल्ला दिलाय की मी तुम्हाला औपचारिकरित्या आमंत्रण द्यावं. आता मी तुम्हाला औपचारिक पद्धतीनं हे आमंत्रण देतोय. जर तुम्हाला योग्या वाटत असेल तर आपण भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार डॉ. हर्ष वर्धन यांनाही या चर्चेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण देऊ शकतो’ असं म्हटलंय.
शीला दीक्षित यांनी या आमंत्रणाला होकारार्थी उत्तर दिलं तर अमेरिका अध्यक्षाच्या निवडणुकीआधी अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या उमेदवारांमध्ये ‘प्रेसिडेन्शिअल डिबेट’ भरतं... त्याचप्रमाणे दिल्लीतही आपल्याला ‘सीएम डिबेट’ पाहायला मिळू शकतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.