जम्मू : धरती पर कही स्वर्ग है तो यही है। असं वर्णन असणारं काश्मीरखोरं. हे खोरं सध्या मात्र पाण्याखाली गेलं आहे. आता धडपड सुरू आहे ती लोकांना वाचवण्याची. आणि या संकटकाळी काश्मीरी जनतेसाठी कुणी धावून आलं असेल तर ते आपल्या देशाचे सैनिक. आज काश्मीर खोऱ्यात २१ हजार सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत.
भारताचं नंदनवन आज पुराच्या पाण्याखाली गेलं आहे. गेल्या 60 वर्षांतील ही जम्मूकाश्मीरवर ओढवलेली सगळ्यात मोठी नैसर्गिक आपत्ती. जम्मूकाश्मीरमधला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा जलप्रलय. या प्रलयात आत्तापर्यंत 200 जणांचा मृत्यु झाला आहे तर 500 हून अधिक गाव पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. काश्मीरखोऱ्याचा 70 चे 80 टक्के भाग अंधारात गेला असून मोबाईल, टेलिफोन, इंटरनेट सारं काही ठप्प झालं आहे. मात्र या सगळ्या प्रलयातही बचावकार्य जोरात सुरू आहे आणि याचं सगळं श्रेय आहे ते सेनेच्या जवानांना.
या पोलादी हातांनी आज हजारो जणांना जीवनदान दिलं आहे, एक एक हात शेकडो जणांसाठी मोलाचा ठरत आहे.तो ही कुठलाही स्वार्थ न बघता. कालपरवापर्यंत ज्या काश्मीरी जनतेच्या डोळ्यात या सैनिकांबद्दल तिरस्कार दिसत होता त्याच जनतेसाठी आज ते देवदूत बनले आहेत. कधी काळी गो बॅक म्हणणारी जनता आज त्यांच्यामध्येच आधार शोधत्येय.
जम्मू-काश्मीर स्वतंत्र झाल्यांनतर पहिल्यांदाच राज्यात एवढा मोठा पूर आला आहेआणि या पुरातही लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे जवान म्हणजे अदम्य साहसाचे प्रतिकच.
मग नौशहरा सारख्या एका गावात एका माणसाला वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न असोत किंवा कुपवाडामध्ये पुराच्या पाण्यात फसलेल्या लोकांना वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न असोत. आज या प्रसंगातून वाचलेल्या काश्मीरी जनतेच्या मनात एकच भावना आहे ती म्हणजे सेना नसती तर कुणीच जिवंत राहिलं नसत.
सीआरपीएफ, बीएसएफच्या जवानांबरोबरच वायुसेनेचे 45 एअरक्राफ्टस् , मरीन कमांडोस्, एनडीआरएफ च्या 17 टीम्स् , 65 मेडीकल टीम्स , 25 इंजिनिअरिंग टास्क फोर्स हे सगळे या या जलप्रलयाचा सामना करत आहेत.
एकेका व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रत्येक सैनिक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. अगदी आपल्या जीवाची पर्वा न करता. आणि जोपर्यंत पुरात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीली सुरक्षित स्थळी पोचवलं जाणार नाही तोपर्यत सैनिक आपल्या बराकीत परतणार नाहीत असा निर्धारच या सैनिकांनी केला आहे.
43,000 लोक सुरक्षितस्थळी
जवळपास चार लाख नागरिक अडकले आहेत. बचावकार्यात आत्तापर्यंत 43,000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. तर मृतांचा आकडा 200 वर गेल्याची माहिती मिळत आहे. वायुदलाची 61 चॉपर्स, तसंच मालवाहू विमानांनी आत्तापर्यंत बचावकार्यासाठी 354 फे-या केल्या आहेत.
संरक्षण दलांचे जवळपास एक लाख जवान बचावकार्यासाठी अहोरात्र झटत आहेत. हवामानात गेल्या काही तासांत सुधारणा झालीय, त्यामुळे श्रीनगर आणि जवळपासच्या काही शहरात पाण्याची पातळी खालावली आहे. ही बाब बचावकार्याच्या दृष्टीनं समाधानाची आहे. बचावकार्यात आर्मीच्या 110 बोटी आणि एनडीआरएफच्या 148 बोटी तैनात आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.