श्रीनगर : काश्मीरमधील तरूण-तरूणींना रोजगार हवा आहे, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. कारण लष्करात किंवा पोलिसांत भरती झालात तर खबरदार, अशा धमक्या देणाऱ्या दहशतवाद्यांना ठेंगा दाखवत काश्मिरी तरुण-तरुणींनी पोलीस भरतीसाठी रांगा लावल्या आणि धमक्यांना कोणतीही भिक घातली नाही.
जम्मू-काश्मीर पोलीस खात्यात उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या शारीरिक क्षमता चाचणीसाठी खोऱ्यातील २ हजार तरुण-तरुणी सहभागी झाले होते.
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात लष्कराचे तरुण-तडफदार अधिकारी लेफ्टनंट उमर फयाज यांची दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. भारतीय लष्करापासून दूर राहा, असा गर्भित इशाराच त्यांनी काश्मिरींना दिला होता. परंतु, या घटनेला चार दिवस उलटत नाहीत, तोच काश्मिरी तरुणांनी आपले बुलंद इरादे स्पष्ट केलेत.
स्थानिक महिलांची मदत करण्यासाठी पोलीस खात्यात येण्याची इच्छा नुसरत या तरुणीनं बोलून दाखवली. जम्मू-काश्मीर पोलिसांत काम करायची संधी मिळाली तर मी स्वतःला नशीबवान समजेन, असं फरझाना म्हणाली.
आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे. पोलीस उपनिरीक्षकाच्या ६९८ जागांकरिता तब्बल ६७ हजार २१८ जणांनी अर्ज भरला आहे. त्यांच्यापैकी २ हजार तरुण-तरुणींनी शनिवारी बख्शी स्टेडियममध्ये रांगा लावल्या होत्या.