चेन्नई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता २३ मे रोजी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत, अशी माहिती एआयडीएमकेचे प्रवक्ते सीआर सरस्वती यांनी दिली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी जयललिता यांची निर्दोष सुटका झाली आहे.
सध्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार पाहत असलेले ओ. पनीरसेल्वम २२ मे रोजी राजीनामा देणार आहेत, त्यानंतर २३ मे रोजी जयललिता मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील, अशी माहिती सरस्वती यांनी दिलीय.
जयललिता यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवेळी उपस्थित राहणाऱ्यांची नावे अद्याप प्रसिद्ध झालेली नाहीत.
जयललिता यांनी २०११ साली ज्यावेळी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित होते. तर त्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना जयललितांनी हजेरी लावली होती.
उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मोदी यांनी दूरध्वनीद्वारे जयललिता यांना शुभेच्छा दिल्या होत्या. न्यायालयाच्या निर्णयानंतर जयललिता यांनी 'हा न्यायाचा विजय आहे' अशा शब्दांत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.