Prakash Ambedkar: राज्यात विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात मोठी उलथापालथ होणार, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत मोठा भूकंप होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तशा संभाव्य तारखाही त्यांनी सांगितल्या आहेत. झी २४ तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी मुलाखतीत म्हटलं आहे की, निवडणुकांनंतर राज्यात मोठी उलथापालथ होणार आहे. महाराष्ट्राला मोठं सरप्राइज मिळणार आहे. पण त्या आधीही म्हणजेच 8 ते 12 ऑक्टबरपर्यंत महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार आहे. मात्र वंचित या भूकंपाचा भाग राहणार नाही. सत्तेतील पक्ष व बिगर पक्ष या भूकंपाचा भाग राहतील. निवडणुकीच्या आधी व नंतरदेखील मोठ्या घडामोडी राज्यात घडतील, असा गौप्यस्फौट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
दरम्यान, राज्यातील या सरप्राइजमध्ये वंचितचा सहभाग नसणार. आमची भूमिका म्हणजे राज्यात दंगल होऊ न देणे हा जसा आमचा आरक्षणाबाबत उद्देश होता. तसंच, आम्ही आत्ताही शांतीदूत म्हणूनच राहणार आहोत, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही जागावाटपावरून संघर्ष सुरू आहे. काँग्रेस 150 जागांच्या खाली यायला तयार नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस 88 जागांच्या खाली यायला तयार नाही. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेना फक्त 44 जागा मिळतील. त्यामुळे मविआतील जागावाटपावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर सर्वात मोठा पेच असणार आहे,असंही आंबेडकर यांनी दावा केलाय. उद्धव ठाकरेंसाठी आम्ही दरवाजे बंद केलेले नाहीत. उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर चर्चा करु असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय.
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात तिसरी आघाडी उभारण्याची तयारी सुरु केली आहे. या तिसऱ्या आघाडीत मराठा आंदोलक मनोज जरांगे सामील होऊ शकतात अशी चर्चा रंगली रंगली होती. आम्ही मनोज जरांगे यांच्याशी आघाडी करु शकत नाही असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आरक्षणवादी असलो तरी जरांगेंच्या मागणीला आमचा पाठिंबा नाही असं आंबेडकरांनी म्हटलंय. तसंच जरांगेही आमच्यासोबत येऊ शकत नाही कारण त्यांना तडजोड करावी लागेल असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलंय.