देशभरात जन्माष्टमीचा उत्साह... सगळीकडे गोविंदा रे गोपाळा!

देशभरात श्रीकृष्ण जन्मष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. उत्तर भारतातली श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा इथलं वातावरण डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. मथुरेतल्या श्रीकृष्ण मंदिरात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाचा साक्षीदार होण्यासाठी देशातल्या कोनाकोपऱ्यातून भाविकांनी मथुरेतल्या मंदिरात हजेरी लावली होती. 

Updated: Sep 6, 2015, 04:40 PM IST
देशभरात जन्माष्टमीचा उत्साह... सगळीकडे गोविंदा रे गोपाळा! title=

नवी दिल्ली: देशभरात श्रीकृष्ण जन्मष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. उत्तर भारतातली श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा इथलं वातावरण डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. मथुरेतल्या श्रीकृष्ण मंदिरात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाचा साक्षीदार होण्यासाठी देशातल्या कोनाकोपऱ्यातून भाविकांनी मथुरेतल्या मंदिरात हजेरी लावली होती. 

पाहा जन्माष्टमीचा उत्साह... दहीहंडी!

 

रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मसोहळा साजरा करण्यात आला. त्याआधी आकर्षक वेशभूषा, अलंकार, तसंच साजशुंगार यांनी कृष्णमूर्ती सजवण्यात आली. जय कन्हैया लाल की या गजरानं सारा मंदिर परिसरच कृष्णभक्तीत न्हाऊन निघाला होता. 

शिर्डीत जन्माष्टमी साजरी

देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जातोय. तसंच शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही हा उत्सव मोठया भक्तीभावानं साजरा करण्यात येतोय. साईबाबांच्या मंदिरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून बाल कन्हैय्याचं गुणगान केलं जातं. साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत यादिवशी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य भाविक साईदरबारी हजेरी लावतात.. रात्री १२ वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा होऊन शेजारती करण्यात आली... दुपारी मध्यान्ह आरती अगोदर १२ वाजता साई समाधी समोर दहीहंडी फोडली जाणार आहे.

मध्य प्रदेशातील उत्साह

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा उत्साहात साजरा केला. जन्माष्टमी उत्सवानिमित्त आयोजित भोपाळमधल्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी स्वतः मुख्यमंत्री चौहान यांनी दहीहंडी तर फोडलीच, सोबतच श्रीकृष्णावरची भक्तीमय गीतंही गायली. 

मुंबईतही भाविकांची गर्दी

श्रीकृष्ण जन्माचा उत्सव मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उत्तर मुंबईतल्या जुहू इथल्या इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्म सोहळा रंगला. जन्माष्टमी निमित्तानं बाळ कान्हाची मूर्ती पाळण्यात ठेऊन त्याला झोके दिले गेले. आकर्षक पोशाखांनी सजवलेली कृष्ममूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली. कृष्णाच्या मूर्तीवर मंत्रोच्चारांसह अभिषेक करण्यात आला. या सोहळ्यासाठी हजारो भक्तांनी मंदिरात तुडुंब गर्दी केली होती. 

तर आता सगळीकडे दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक सज्ज झाले आहेत. यंदा दुष्काळामुळं तसंच सरकारनं घातलेल्या नियमांमुळे दहीहंडीला नेहमीपेक्षा कमी प्रतिसाद असण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.