`मंदिरांपेक्षा शौचालय महत्त्वाचं`... जयराम रमेश वादात

देशात मंदिरांपेक्षा शौचालयं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण असल्याचं वादग्रस्त विधान केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी केलंय. निर्मल भारत यात्रेचा शुभारंभ रमेश यांनी केला. त्यावेळी ते बोलत होते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 7, 2012, 03:12 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
देशात मंदिरांपेक्षा शौचालयं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण असल्याचं वादग्रस्त विधान केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी केलंय. निर्मल भारत यात्रेचा शुभारंभ रमेश यांनी केला. त्यावेळी ते बोलत होते.
‘भारतात ६४ टक्के लोक आजही उघड्यावर शौचाला बसतात, हा एक ग्लोबल रेकॉर्ड आहे. भारतात कुपोषणासारख्या रोगांपासून गावांना वाचवण्यासाठी केंद्र सरकार गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न करतंय. गावागावांमध्ये शौचालय निर्माण करण्यासाठी सरकारनं आत्तापर्यंत ४५ हजार करोड रुपये खर्चही केलेत. आगामी पाच वर्षांतही सरकार १.०८ लाख करोड रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे भारत कुपोषणमुक्त होऊ शकेल’ असं जयराम रमेश यांनी निर्मल भारत यात्रेच्या उद्घाटन सोहळ्या दरम्यान म्हटलंय. या यात्रेमुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शौचालयं साध्य होणार असल्याचं रमेश यांनी म्हटलंय. शिवाय आपल्या देशातली मंदिरं हीच सगळ्यात अस्वच्छ आणि घाणेरड्या ठिकाणी असतात अशी प्रतिक्रियाही रमेश यांनी यावेळी दिलीय.
मंदिरांबाबत केलेल्या या वक्तव्यावरून मात्र ते चांगलेच अडचणीत सापडलेत. मंदिरांबाबतच्या त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडलंय. काँग्रेसला देशातली मंदिरच का दिसतात असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय. दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनीही जयराम रमेश यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शनं केलं.