गोव्यात ‘शॅक्स’साठी कडक नियम...

गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या पर्यटन उद्योगाला शिस्त लागावी यासाठी सरकारनं नवं ‘शॅक्स धोरण’ जाहीर केलं. त्यानुसार गोव्याच्या किनारपट्टीवर ३२९ शॅक्सना परवानगी देण्यात आली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 7, 2012, 01:46 PM IST

www.24taas.com, गोवा
गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या पर्यटन उद्योगाला शिस्त लागावी यासाठी सरकारनं नवं ‘शॅक्स धोरण’ जाहीर केलं. त्यानुसार गोव्याच्या किनारपट्टीवर ३२९ शॅक्सना परवानगी देण्यात आली.
कोणालाही भुरळ पडावी असं निसर्ग सौंदर्य, साद घालणारा समुद्र आणि नयनरम्य किनारे... निळाशार पाण्यात आणि रुपेरी वाळूच्या माडांच्या वनात धम्माल करण्याची मजाच काही औरच... त्यासाठी गोव्याशिवाय दुसरा उत्तम पर्याय कोणता असू शकतो... काहीशी पाश्चिमात्य जीवनशैली यामुळंही गोवा एक आतंरराष्ट्रीय पर्यटनस्थळ बनलंय. दरवर्षी जवळपास देशातील २५ लाख तर परदेशातले पाच लाख पर्यटक गोव्याला भेट देतात. ऑक्टोबर ते मे या आठ महिन्यांच्या कालावधीत तर गोव्यात पर्यटकांची जणू जत्राच भरते. खुणावणाऱ्या गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर अशाप्रकारे शॅक्सवर आराम करत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सारेच आतुर असतात. त्यामुळं या काळात किना-यावर तात्पुरते शॅक्स उभारण्यात येतात. मात्र, कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणा-या या शॅक्स व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू लागलीय. याला आळा घालण्यासाठी शॅक्सधारकांवर गोवा सरकारनं काही निर्बंध घातलेत. तर त्याना सीसीटीव्ही लावणं बंधनकारक करण्यात आलं. शिवाय समुद्र कासवांची ये-जा असणाऱ्या मोरजी आणि गालजीबाग किनाऱ्यावर शॅक्स उभारणीला प्रतिबंध घालण्यात आलेत तर शॅक्सची संख्या ३२९ करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी दिलीय.
पर्यटकांना भिकारी आणि इतर गोष्टींचा त्रास होऊ नये यासाठी विशेष सुरक्षेचे उपाय करण्यात आलेत. यंदा शॅक्सवर बसून गोव्याच्या समुद्र किना-याचा आनंद लूटत असतावना शॅक्सची कमतरता जाणवल्यास आश्चर्य वाटायला नको.